मीरा रोडमध्ये गळा आवळून निर्घृण हत्या
By admin | Published: January 31, 2017 11:24 PM2017-01-31T23:24:55+5:302017-01-31T23:24:55+5:30
रमेश अपुर (22) रा. पद्माकर राऊत चाळ, दहिसर गावठण, मुंबई या तिच्या प्रियकरास दहिसर येथून आज सकाळी अटक केली आहे
ऑनलाइन लोकमत
मीरारोड, दि. 31 - भाईंदरच्या गोल्डन नेस्ट वसाहतीत दीपिका कार्तिक संघवी (29) व तिची 8 वर्षांची मुलगी हेतवीच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने विनायक ऊर्फ विकी रमेश अपुर (22) रा. पद्माकर राऊत चाळ, दहिसर गावठण, मुंबई या तिच्या प्रियकरास दहिसर येथून आज सकाळी अटक केली आहे. पैशांची चणचण असलेल्या दीपिकाने विनायककडे पैशांची मागणी चालवली होती. यातून झालेल्या वादात हे दुहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे, असे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी काशिमीरा येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दोघींची झोपेत असताना गळ्याखाली चाकू भोसकून व गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
दीपिका ही पती कार्तिक रा. सेक्टर 4, शांती नगरसोबत गेल्या फेब्रुवारीपासून राहत नव्हती. 2008 साली त्यांनी प्रेमविवाह केला होता. पटत नसल्याने दोघांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले होते व त्यासाठी कार्तिक तिला 5 लाख रुपये व महिन्याला 7 हजार रुपये खर्चास देणार होता. पण त्याने पैसे दिले नव्हते.
दीपिका व विकीची ओळख कॉल सेंटरमध्ये काम करताना झाली होती. गेल्या 7-8 महिन्यांपासून त्यांचे संबंध होते. या कारणामुळे दोघांना कांदिवलीच्या कॉल सेंटरमधून 8-10 दिवसांपूर्वीच काढून टाकले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भाईंदर पूर्वेच्या नक्षत्र टॉवरला लागून असलेल्या सोनम सरस्वती इमारतीत दीपिका ही हेतवीसह भाडय़ाने राहत होती. तेथे विकीचे घरी येणे जाणे होते व तो रात्री राहत देखील असे. शनिवार 28 जानेवारी रोजी दोघींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली. तिचा फक्त एक मोबाईल मारेक-याने नेला होता.
इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मुळे पोलिसांना आरोपीचा शोध लावणो सोपे झाले. तीच्या घरी तीघे जण येतजात होते. पण फुटेज मध्ये विकी हा 25 च्या रात्री इमारतीत आला होता. 26 रोजी सकाळी 7च्या सुमारास स्वत:चा चेहरा लपवत तो इमारतीतुन बाहेर पडल्याचे दिसले होते. त्यारात्री त्याचे दिपीकाशी पैशान वरून भांडण झाल्याचे शेजारच्या मुलाने ऐकले होते. त्या रात्री बेडरुमचा पंखा बंद असल्याने दिपीका, हेतवी व विकी हे बाहेरच हॉल मध्ये झोपले होते. रात्री अडिजच्या सुमारास विकीने आधी दिपीकाच्या गळ्या खाली चाकू खुपसला व गळा दाबुन हत्या केली. या वेळी हेतवी जागी झाल्याने तीला देखील चाकूने भोसकले व गळा आवळुन ठार मारले. नंतर त्याने हेतवीचा मृतदेह बिछान्यात गुंडाळुन पलंगाच्या कप्प्यात ठेवला. जाताना त्याने दिपीकाचा मोबाईल घेतला.
तिथून त्याने भाईंदर रेल्वे स्थानक गाठले. चाकू त्याने वाटेतच टाकला. पालघर येथे एका नातलगाच्या दिवसकार्याला जायचे असल्याने त्याने आईला फोन करून विरार स्थानकात स्वत:चे कपडे सोबत घेऊन येण्यास सांगितले. विरार येथून पालघरला जाताना ट्रेन मध्येच त्याने कपडे बदलले. तेथून तो घरी गेला. शनिवार 28 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत तो दहिसर येथील घरीच होता.
इकडे दीपिका व हेतवीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे कळताच त्याने आईने दिलेली सोन्याची चेन दहिसरच्याच सराफाकडे गहाण ठेवून 10 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याने बसस पकडत गोवा गाठले. गोव्यावरून तो ट्रेनने पुन्हा मुंबईत आला. तिथून तो बसने शिर्डीला गेला. इकडे स्थानिक गुन्हे शाखा काशिमीरा युनिटचे सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल वाघ व उपनिरीक्षक अभिजीत टेलरसह पोशिरकर, पंडित विजय ढेमरे, पुष्पेंद्र थापा, अविनाश गर्जे, किशोर वाडिले, संजय शिंदे, अजरुन जाधव, पाटील, श्रीवास्तव, जगताप, केंद्रे आदीचे पथक विकीचा शोध घेत होते. त्यांनी विकीच्या कुटुंबीयांपासून मित्र, परिचीत आदींची चौकशी चालवली होती. विकीने त्याच्या एका परिचीतास संपर्क साधला होता. प्रफुल्ल वाघ व त्यांच्या पथकाने परिचिताच्या माध्यमातून सापळा रचून शिर्डीवरून आलेल्या विकीला आज सकाळी 7.30 च्या सुमारास दहिसरच्या रुस्तमजी शाळेजवळ पकडले.
विकीने दोघींच्या हत्येची कबुली दिली आहे. दिपीका त्याच्याकडून वीस-पंचवीस हजार रुपये मागत होती. पण कामावर नसल्याने पैसे देणो शक्य नसल्याने दोघांमध्ये भांडण होत होते. दीपिका त्याला पैसे नाही दिलेस तर मी आत्महत्या करून तुङयासह कुटुंबीयांना खडी फोडायला लावेन, असा दम देत असे. यातूनच त्याने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या आधी पण त्याने तिला 40 हजार रुपये दिले होते. विकी हा तसा ऐय्याश वृत्तीचा असून, त्याने काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. पती नसल्याने दीपिका देखील त्याच्या गळाला सहज लागली, असे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी विकीकडून दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. हत्येनंतर आपल्यावर संशय जाऊ नये म्हणून त्यानेच तिच्या मोबाईलमधूनच तिच्या मित्रांना आपण पती व मुलीसह महाबळेश्वर येथे असल्याचा मॅसेज टाकला होता. गुन्हे शाखेने विकीला नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे पुढील तपास करत आहेत.