पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा!
By admin | Published: June 21, 2017 05:16 PM2017-06-21T17:16:03+5:302017-06-21T17:16:03+5:30
पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली.
कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांना गळ : संवाद कार्यक्रमात उफाळून आले राष्ट्रवादीतील मतभेद
वाशिम : गत नगर पालिका निवडणूकीत पक्षांतर्गत बंडाळी आणि गद्दारांनी छुप्या मार्गाने विरोधकांची साथ दिल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. पक्ष वाढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणारी ही बाब लक्षात घेवून सर्वप्रथम पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली.
२१ जून रोजी स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्यसंवादह्ण कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी खासदार सुळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माती जिल्हाध्यक्ष पांडूरंग ठाकरे, बाबाराव खडसे, दिलीप जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपापले मत व्यक्त करताना सांगितले, की जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकदरम्यान स्थिती सकारात्मक असतानाही ऐनवेळी पक्षातीलच काही मंडळींनी गद्दारी केल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. वाशिममध्ये पक्षाचे ३० पैकी केवळ २ नगरसेवक निवडून आले. हीच स्थिती जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये राहिली. त्यामुळे प्रथम पक्षातील अशा गद्दारांना निवडून त्यांना बाजूला करावे लागेल, तेव्हाच पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. इतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत बंडाळीविषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करून जे कार्यकर्ते इमानेइतबारे पक्षाचे काम करतात, त्यांना उमेदवारी मिळावी, त्यांच्या प्रगतीसाठी पक्षाने झटायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.