दिवाळीनिमित्त एसटीच्या २०४ गाड्यांची व्यवस्था
By Admin | Published: October 19, 2016 10:11 PM2016-10-19T22:11:01+5:302016-10-19T22:11:01+5:30
दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने यंदा २७ ते २९ आॅक्टोबरपर्यंत सोलापूर-पुणे-सोलापूरसाठी जादा एस. टी. गाड्यांची सोय केली असून
>- रेवणसिद्ध जवळेकर/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 19 - दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने यंदा २७ ते २९ आॅक्टोबरपर्यंत सोलापूर-पुणे-सोलापूरसाठी जादा एस. टी. गाड्यांची सोय केली असून, तीन दिवसांमध्ये २०४ बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर सोलापूर आगारातील १५ जणांची पर्यवेक्षक टीम सज्ज राहणार असल्याचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सोलापूर आगारातील सोलापूरसह अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, अकलूज, करमाळा आणि बार्शी बसस्थानकावरून तीन दिवसांमध्ये पुण्यासाठी आणि पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरुन सोलापूरसाठी या जादा गाड्या धावणार आहेत. २७ आॅक्टोबर रोजी ६८ बसेस, २८ रोजी ९२ तर २९ आॅक्टोबर रोजी ४४ बसेस तर २६ रोजी वसू बारसनिमित्त ३४ अशा २३८ बस गाड्या सोलापूर आगारातील विविध डेपोतून धावणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील विविध भागांमधून सोलापूरला येणाºया आणि इथून राज्यात ठिकठिकाणी जाणाºया प्रवाशांचाही विचार सोलापूर आगाराने केला आहे. इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, मुंबई, भिवंडी, बोरोवली, नाशिक, औरंगाबाद, दापोली, चाळीसगाव, अहमदनगर, श्रीरामपूर, चिपळूण, त्र्यंबकेश्वर, शिखर शिंगणापूर, तुळजापूर, लातूर, उस्मानाबाद, शिर्डी, जालना, लोणार आदी भागांमध्येही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दिवाळी कालावधीत प्रवाशांच्या कुठल्याही अडचणी सोडवण्यासाठी खास पथकही सोलापूर बसस्थानकासह इतर डेपोत सज्ज राहणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
चौथ्या शनिवारचाही विचार...
२२ आॅक्टोबर हा दिवस चौथा शनिवार आहे. चौथ्या शनिवारला जोडून रविवार आणि पुढे शासकीय, निमशासकीय आणि खासगी ठिकाणी काम करणारी मंडळी दिवाळीची रजा घेतील, हा विचार करून सोलापूर-पुणे-सोलापूरसाठी ४५ बस गाड्यांच्या फेºया होणार आहेत.
तिकीट दरात अंशत: वाढ
दिवाळी हंगामात राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. दिवाळी उत्सवातील प्रवाशांना जलद सुविधा द्याव्या लागतात. यासाठी हंगामात तिकीट दरात अंशत: वाढ करावी लागते. त्यामुळे यंदा तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील बहुतांश मंडळी आज कामानिमित्त पुण्यात आहेत. त्यांच्यासाठी सोलापूर आगाराने जादा एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. सोलापूर आगाराच्या वतीने त्यांना ही एक दिवाळी भेटच म्हणावी लागेल.
- श्रीनिवास जोशी
विभाग नियंत्रक, सोलापूर विभाग
दिवाळीनिमित्त एस. टी. प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा लक्षणीय असते. सुखद प्रवास हाच एस. टी. चा प्रवास करून दिवाळी गोड करावी. खासगी गाड्यांनी प्रवास करणे टाळावे.
- मुकुंद दळवी
विभागीय अधीक्षक, सोलापूर आगार