बोगस कागदपत्रांच्या आधारे कंपनी ताब्यात घेणाऱ्याला अटक
By admin | Published: September 24, 2016 02:34 AM2016-09-24T02:34:57+5:302016-09-24T02:34:57+5:30
सफल ग्रुप कंपनीची आपल्या नावाने नोंदणी करून फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या गोविंद जाधवानी (५६) या माजी संचालकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली
मुंबई : बोगस कागदपत्रांच्या आधारे सफल ग्रुप कंपनीची आपल्या नावाने नोंदणी करून फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या गोविंद जाधवानी (५६) या माजी संचालकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
जाधवानी हे सफल ग्रुपचे माजी संचालक आहेत. गोवंडी येथे राहणारे वरुण असराणी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा बांधकाम व्यवसायासह रिअल एस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची सफल ग्रुप नावाची कंपनी असून १५ वर्षांपासून जाधवानी कंपनीचे संचालक होते. ३० मार्च २०१५ रोजी निवृत्त झाला. या वेळी नियमानुसार येणारी रक्कम कंपनीकडून देण्यात आली होती. मात्र निवृत्तीनंतर जाधनावी यांनी सफल ग्रुप कंपनी आपल्या मालकीची असल्याची बनावट कागदपत्रे आणि लोगो तयार करून त्याची नोंदणी केली होती. कंपनीशी वरूण असराणी व त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता.
गेल्या वर्षी हा प्रकार वरुण असराणी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन जाधवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १५ वर्षे कंपनीत काम करताना अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे कंपनीचे ट्रेड मार्क आपल्या नावावर करून घेतले होते. त्यानंतर आपण कंपनीचे सर्वेसर्वा असल्याचे जाधवानी याने सांगायला सुरुवात केली.