...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:10 AM2022-01-19T06:10:31+5:302022-01-19T06:11:45+5:30

नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

arrest congress leader nana patole demands bjp leader chandrakant patil | ...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

googlenewsNext

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, मोदींना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांना शरद पवार काशीचा घाट दाखवतील! हे काय चालले आहे? राज्यात अंडरवर्ल्डचे राज्य आहे का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. 

‘...तर थोबाडीत मारली असती’, असे विधान केले म्हणून नारायण राणे यांना सरकारने अटक केली. आता पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंनाही अटक करा. पण प्रशासन दबावात असल्याने तसे करणार नाही. तक्रार घेऊन गेलेले आमचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावरच कारवाई केली. आ. चंद्रशेखर बावनकुळे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले, पण पटोलेंविरुद्ध कारवाई झाली नाही.  आम्ही न्यायालयात जाऊ, असे पाटील म्हणाले. 

नवाब मलिक यांनी काशीच्या घाटाबाबत विधान केले. उद्या फडणवीस यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी मलिक यांची असेल, असेही ते म्हणाले. 

सहा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरले. 
१३ जानेवारी रोजी खोपडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्यांनीच सोशल माध्यमांवरून सर्वांना ती माहिती दिली होती. त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते. 
मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी संपर्क साधला. कुठलीच लक्षणे नसतील तर बाहेर निघण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याने मी आंदोलनात सहभागी झालो, अशी भूमिका खोपडे यांनी मांडली.  
चिलकर म्हणाले, खोपडे यांना केवळ कोरोना प्रोटोकॉलची माहिती दिली.  खोपडे यांनी ते पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही माहिती मला दिली नव्हती.    

जरा गोव्यातील मते बघितली का? 
गोव्यात गेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकूण ७९२ मते मिळाली होती. सर्व ठिकाणी डिपॉझिट गेले. उत्तर प्रदेशात ५७ पैकी ५६ जागी डिपॉझिट गेले. 
राष्ट्रवादीने गोव्यात १७ जागा लढविल्या. ३०,९१६ मते मिळाली. आता शिवसेनेचे संजय राऊत गोवा, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करायला निघाले आहेत, अशी खिल्लीही पाटील यांनी उडविली. 

Web Title: arrest congress leader nana patole demands bjp leader chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.