व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज प्रकाश सुर्वेंना अटक करा, कारण...; वरूण सरदेसाईंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 04:08 PM2023-03-14T16:08:36+5:302023-03-14T16:08:44+5:30
पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर हा व्हिडिओ मॉर्ब झालाय की नाही हे शोधायला हवं असं वरूण सरदेसाईंनी म्हटलं.
मुंबई - शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आता ठाकरे गटानेही आक्रमक होत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ ते १० तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यात युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता विधानसभेत या मुलांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांना अटक करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे.
वरूण सरदेसाई म्हणाले की, पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर हा व्हिडिओ मॉर्ब झालाय की नाही हे शोधायला हवं. मॉर्ब व्हिडिओ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. हा व्हिडिओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी फेसबुक पेजवर अख्खा तसाच्या तसा लाईव्ह केला होता. तर त्यामुळे मुंबई पोलीस दल सक्षम आहे. ते बरोबर मुख्य आरोपी आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहेत त्यांना अटक करू शकतात असं त्यांनी सांगितले.
विधानसभेत खडाजंगी
या प्रकरणावरून विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात खडाजंगी झाली. आमदार आव्हाड म्हणाले की, या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत त्या पोरांची चुकी काय हे तरी कळू द्या. मुख्यमंत्री शिंदेंनी संवेदनशील होऊन या प्रकरणात उत्तर द्यावे. तरूण पोराचं आयुष्य यात बर्बाद होतंय असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का? असं सांगत शंभुराज देसाईंनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले.
पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?
तर ठाकरे गटाच्या युवा नेत्याला या प्रकरणी अटक झाली. त्यावर साईनाथ दुर्गेला झालेली अटक ही चुकीची असून कायद्याचा गैरवापर आहे. मला ते प्रकरण फारसं माहित नाही. जो व्हिडिओ आलाय तो खरा की खोटा याचा शोध घ्या. व्हि़डिओ मॉर्फिंग झालंय की नाही त्याचा तपास करा. त्यासंदर्भातील पुरुष आमदाराची तक्रार आहे का? ते कुठे आहेत. बदनामी त्यांची झालीय. जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? आणि मिंदे गटातील महिलेचा आरोप माझी बदनामी झालीय. त्याबाबत खटले दाखल होऊ शकते. ही चित्रफित व्हायरल होतेय लाखो कोट्यवधी लोकांमध्ये जाते मग तुम्ही किती जणांना अटक करणार? असं सांगत संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.