मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 08:12 PM2018-02-06T20:12:25+5:302018-02-06T20:13:28+5:30
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले.
पुणे - कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले.
कोरेगाव भीमा परिसरात २ गटात जातीय निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला होता़ तसेच सुमारे ९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले होते़ शिकापूर पोलीस ठाण्यात विविध कलमासह अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रतिबंधक सुधारणा कायद्यानुसार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आजवर अनेकांना अटकही केली आहे़ मिलिंद एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला़ त्यानंतर शनिवारी एकबोटे यांच्या शिवाजीनगर येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील घरी ग्रामीण पोलीस अटक करण्यासाठी गेले होते़ परंतु, ते तेथे मिळून आले नाही़
त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला़ त्यात मिलिंद एकबोटे हे त्यांच्या सध्याच्या घरी मिळून येत नाही़ त्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी महिन्याभरात त्याचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, जिल्ह्यातील सर्व गोशाळा, हॉटेल येथे शोध घेतला़ घराची झडती घेतली़ वेगवेगळ्या पोलीस पथकांनी या गुन्ह्यातील सर्व सहआरोपी यांच्याकडे चौकशी केली़ त्यांच्याशी यापूर्वी मोबाईलवरुन संपर्क असलेल्या सर्वांकडे चौकशी केली़ जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट येथे तपासणी केली असे सर्व प्रयत्न केल्यानंतरही ते मिळून न आल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करावे, अशी विनंती पोलिसांनी केली़ पोलिसांच्या विनंतीनुसार सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले़ या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्वंतत्र पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहे़
अटक वॉरंटनंतर पुढे काय?
सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता त्यांचा शोध अधिक व्यापक प्रमाणावर घेतला जाईल़ या अटक वॉरंटची प्रत त्यांच्या निवासस्थानी देतील़ त्यांनी ती घेतली नाही तर तेथे ती चिटकविली जाते़ ते जेथे कोठे असतील अथवा मिळतील, ते अटक करु शकतील़ आगामी आठ दिवसात ते पोलिसांना मिळाले नाही अथवा स्वत: न्यायालयात हजर झाले नाही तर पोलीस पुन्हा न्यायालयात जाऊन त्यांना फरार घोषित करण्याची मागणी करु शकतात़ त्यानंतर न्यायालय जाहीरनामा प्रसिद्ध करुन त्यांना फरारी घोषित करेल़ एकदा त्यांना फरारी घोषित केल्यावर त्यांना मदत करणाºया अथवा त्यांना लपून ठेवणाºयांवर पोलीस वेगळे गुन्हे दाखल करु शकतात़ तरीही ते न मिळाल्यास त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केली जाते़
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मिलिंद एकबोटे यांच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या लोकांना ग्रामीण पोलिसांनी बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे़ गुन्हा घडल्यानंतर पुढील काही दिवस मिलिंद एकबोटे यांच्याशी अनेक जण संपर्कात होते़ त्या सर्वांना पोलिसांकडून बोलण्यात येत आहे़ त्यांचे नातेवाईक, मित्र, त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या लोकांकडे चौकशी करण्याची जबाबदारी स्वतंत्र पथकाकडे सोपविण्यात आली आहे़