नाशिक जिल्हा परिषद सदस्याविरोधात अटक वॉरंट
By admin | Published: March 8, 2017 09:40 PM2017-03-08T21:40:09+5:302017-03-08T21:40:09+5:30
मुंबई नाका पोलीस ठाणे : सदस्य मनीषा पवार यांनी दिलेला धनादेश बाऊन्स
नाशिक : बांधकाम व्यवसायाच्या जाहिरातीपोटी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आल्याने जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्य मनिषा पवार, त्यांचे पती रत्नाकर पवार व भागीदार नागेश पांडे या तिघांविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वारंट काढले आहे़ न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना या तिघांनाही अटक करण्याचे आदेशच या वॉरंटद्वारे दिले आहेत़
जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार यांचे पती रत्नाकर पवार यांचा भागीदारीत बांधकाम व्यवसाय आहे़ त्यांनी बांधकाम व्यवसायाबाबत वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींच्या बिलापोटी एक लाख ४७ हजार रुपयांचा धनादेश एका जाहिरात कंपनीस दिला होता़ या कंपनीने तो वटण्यासाठी बँकेत जमा केला असता तो न वटता परत आला़ जाहिरात कंपनीने वेळोवेळी पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्यामुळे पवार दाम्पत्य व पांडे या तिघांविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अॅड़ दीपक केदारे यांनी सांगितले़
या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी (दि़७) या तिघांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते़ मात्र, हे तिघेही गैरहजर राहील्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या तिघांच्याही अटकेचे आदेश मुंबई नाका पोलिसांना दिले आहेत़ मनीषा पवार या सौदाणे गटातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या असून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहिर केले आहे. (प्रतिनिधी)