रायफल बाळगणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 02:04 AM2016-10-31T02:04:55+5:302016-10-31T02:04:55+5:30
अटी व शर्तीचा भंग करत रायफल बाळगणाऱ्यास एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : अटी व शर्तीचा भंग करत रायफल बाळगणाऱ्यास एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती मूळ जम्मूची असुन काही महिन्यांपासून सानपाडा येथे रहायला आहे. त्याने नवी मुंबई पोलिसांची परवानगी न घेताच रायफल बाळगली होती.
एपीएमसी आवारात फिरणाऱ्या एका व्यक्तीकडे रायफल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. यावेळी एका व्यक्तीच्या कारची झडती घेतली असता, त्याच्याकडे अद्ययावत रायफल व १५ काडतुसे आढळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता रायफल त्याने जम्मू येथून आणल्याचे समजले.
शिवाय शस्त्र बाळगण्याचा जम्मू पोलिसांचा परवाना असल्याचेही स्पस्ट झाले. मात्र नवी मुंबईत वास्तव्याला आल्यानंतर ३० दिवसात त्यांनी स्थानिक पोलिसांना शस्त्राची माहिती देऊन परवानगी घेण्याची आवश्यकता होती. मात्र नवी मुंबई पोलिसांची परवानगी न घेता रायफल बाळगली होती. सदर व्यक्ती व्यापारी असून स्वत:च्या सुरक्षेसाठी हे शस्त्र वापरत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्याकडील परवाना खरा आहे की खोटा हेही तपासले जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले.