मुक्ताईनगरीत २०० दींड्यांचे आगमन
By admin | Published: February 21, 2017 07:22 PM2017-02-21T19:22:45+5:302017-02-21T19:22:45+5:30
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळी कोथळी-मुक्ताईनगर येथे जुन्या व नवीन मंदिरावर ध्वजपूजनाने श्री संत मुक्ताई यात्रोत्सवात सुरुवात झाली.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 21 - श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळी कोथळी-मुक्ताईनगर येथे जुन्या व नवीन मंदिरावर ध्वजपूजनाने श्री संत मुक्ताई यात्रोत्सवात सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करून यात्रोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी संस्थानचे विश्वस्त व व्यवस्थापक रवींद्र हरणे, उद्धव जुनारे उपस्थित होते.
माघ कृष्ण दशमीपासून दरवर्षी श्री संत मुक्ताबाईची यात्रा सुरू होते. केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भ, खान्देश, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर दींड्यांचे आगमन मुक्ताईनगरीत होत असते. आजपावेतो नवीन मंदिरावर जवळपास १०० दींड्या तर जुन्या मंदिरावर १५ दींड्यांचे आगमन झाले आहे. दींड्यांचे आगमन माघ एकादशी म्हणजेच बुधवारपर्यंत होत असते. यावर्षी जवळपास २०० च्या वर दींड्यांचे आगमन अपेक्षीत आहे. यात्रोत्सवानिमित्त नगरपरिक्रमा हा आकर्षणाचा विषय ठरणार असून सर्व दींड्या एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करून जुन्या व नवीन मंदिरात स्थानापन्न होतील. संत मुक्ताई संस्थानसाठी ६० पुरुष व ३० महिला सेवेकरी मंदिरात सेवा देत आहेत. रात्री सुभाष महाराज (मनूर) यांचे कीर्तन झाले.
एकादशीच्या दिवशी महानंदाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे. संस्थानतर्फे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील हे पूजेचे मानकरी आहेत. मंगळवारचे अन्नदान माणिकराव पाटील मनुरकर यांनी केले आहे. एकादशीनिमित्त मुक्ताई संस्थान (नवीन मंदिरात तर जुने मंदिरात सीताराम तेली, वरणगाव, शाम व्यवहारे, जळगाव, अशोक पाटील, टाकळी, ता.जामनेर यांच्यातर्फे ६ क्विंटल साबुदाणा फराळ देण्यात येत आहे. जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असल्याने काही प्रमाणात असुविधा असल्यातरी नवीन मंदिराची उत्सुकता वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
मंदीरांवरील आकर्षक: रोषणाईने फेडले डोळ्याचे पारणे
श्री मुक्ताबाई संस्थान कोथळी व मुक्ताईनगर येथील मंदीरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.संस्थानतर्फे भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारी मंडप, शामीयाना, पिण्याचे पाणी महाप्रसाद फराळ आदी सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत शिवाय मान्यवर महाराज मंडळी हभप निवृत्ती महाराज वक्ते हभप संदीपन महाराज,पुंजाजी महाराज परमेश्वर महाराज, रामशंकर महाराज,रविंद्र महाराज, प्रल्हाद महाराज आदींची कीर्तन, प्रवचने होतील. प्राणप्रिय शिष्य योगी चांगदेवाच्या भेटीसाठी आई मुक्ताई वारकरी मेळ्यासह महाशिवरात्री २४ रोजी जातील मुक्ताबाई कडून मानाची पूजा यावेळी करण्यात येईल. लाखोच्या संख्येने येणारे भाविक लक्षात घेवून कोथळी-मुक्ताईनगर-चांगदेव ग्रामस्थ ग्रामपंचायत व सेवा संस्था संघटना नियोजन करीत आहे.भाविक भक्तांच्या सोयीसाठी संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील यांनी केले आहे