पेणमध्ये साखरचौथ गणरायाचे जल्लोषात आगमन
By admin | Published: September 19, 2016 02:48 AM2016-09-19T02:48:13+5:302016-09-19T02:48:13+5:30
संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथ गणरायांच्या उत्सवाची धूम दोन दिवस रंगणार आहे.
पेण : संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथ गणरायांच्या उत्सवाची धूम दोन दिवस रंगणार आहे. रविवारी उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पेणमध्ये उत्सव मंडपात बाप्पांना आणण्यासाठी मिरवणुकांची लगबग पहावयास मिळाली. साखरचौथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती कार्यशाळांमधून मूर्ती घेऊन उत्साही वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला मंडपात नेले. बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांचा जल्लोष रविवारी सायंकाळी पेणमध्ये पहावयास मिळाला.
एकंदर उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच भक्तिमय वातावरणासह कार्यकर्त्यांचा आनंद शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसून आले. साखरचौथच्या गणरायाच्या उत्सवाची क्रेझ पेण, उरण, पनवेल, अलिबागमधील आगरी कोळी समाजात गेल्या दशकभरात वाढली आहे. याचबरोबर गणेशमूर्तीकार व अन्य नवसाचे बाप्पा साखरचौथ संकष्टीनिमित्त उत्साहाने बसविले जातात. याचबरोबर २१ दिवसांच्या बाप्पाचा सुद्धा या उत्सवामध्ये समावेश होतो. पेण शहरात एकूण ६८ साखरचौथ गणराय असून यामध्ये २४ सार्वजनिक मंडळाचे आहेत. तर ग्रामीण भागात खारपाट विभागातील ४२ गावांमध्ये प्रत्येकी दोन सार्वजनिक मंडळाचे बाप्पा गावात असतात, तर खाजगी ४०० च्या आसपास गणपती आहेत. एकंदर युवा मंडळाची क्रेझ, बाप्पाच्या सुंदर आकर्षक मूर्ती, नेत्रदीपक आरास ही या उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. गणरायांची विधिवत गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे. त्यानंतर विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल दोन दिवस रंगणार आहे.
ढोल - ताशे पथकाने बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक जल्लोषात काढली. कासार आळीच्या राजा दरवर्षी कलात्मक अशी बाप्पाची मूर्ती साकारून गणेशभक्तांना आकर्षित करते. याशिवाय अनेक नामवंत मंडळांच्या मूर्तीचा कलाविष्कार साखरचौथ बाप्पाचा उत्साहात पहावयास मिळतो. (वार्ताहर)
>जल्लोष साखरचौथच्या गणेशोत्सवाचा
नागोठणे : भाद्रपद कृ.चतुर्थीनिमित्त होणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवास शहरासह विभागात सोमवारपासून प्रारंभ होत आहे. विभागातील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे पळस येथील मंदिरात सुद्धा हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता किरण वेखंडे यांच्या पौरोहित्याखाली पोलीस पाटील बबन शिंदे दाम्पत्याच्या हस्ते श्रींच्या प्रतिष्ठापनेने या धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता महाआरती होणार आहे.दुपारी १२ ते ४ पारंपरिक नृत्याचा सामना रंगणार आहे. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मंडळाचे वतीने गौरविण्यात येणार आहे. मंगळवारी २० सप्टेंबरला दुपारी१२ वाजता महाआरती व त्यानंतर दुपारी ३ वाजता विसर्जनासाठी गणेशमूर्तीचे प्रस्थान होणार असून सायंकाळी ६ वाजता निडी येथील अंबा नदीत विसर्जन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.