संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे शहरात आगमन
By Admin | Published: June 18, 2017 06:57 PM2017-06-18T18:57:16+5:302017-06-18T18:57:16+5:30
पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर गर्दी केली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - टाळ मृदुंगाचा गजर ... माऊलीच्या नामाचा जयघोष... पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो पाऊले... आकाशी फडकणा-या पताका... रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले भाविक... अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूहून पुण्यात आगमन झाले. पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर गर्दी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे कळस येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. पुण्याचा महापौर मुक्ता टिकळ, उपमहापौर सिध्दार्थे धेंडे यांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. या प्रसंगी नगरसेवक अनिल टिंगरे,किरण जठार ,पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्यानबा-तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथे आगमन झाले. तुकाराम महाराजांच्या ३३२ व्या पालखी सोहळ्याने शनिवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. महापालिकेने बोपोडी थेथे स्वागत कक्ष उभारला होता.
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,आमदार विजय काळे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे,नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर,ज्योती कळमकर, सुनीता वाडेकर,अर्चना मुसळे, सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी पालखीचे स्वागत केले. मुख्य पालखी मार्गाबरोबरच शहरातील भागात वारक-यांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले. पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सर्व सामान्य नागरिकांडून वारक-यांना अन्न दानाचे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले. लहान थोरांपासून ज्येष्ठ पुरूष व महिला दोन्ही पालख्यांमध्ये भक्तीभावाने सहभागी झाले. पालखी सोहळ्यातील तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. वारक-यांची सेवा करण्याबरोबरच तरुणाई पालखी मार्गावर सफाई करताना दिसत होती.