‘कला अंगण’ अद्याप अनावरणाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: July 18, 2016 02:08 AM2016-07-18T02:08:46+5:302016-07-18T02:08:46+5:30
जे. जे. कला महाविद्यालयाच्या संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘कला अंगण’ (डिस्प्ले स्ट्रक्चर) गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला
लीनल गावडे/
मुंबई- जे. जे. कला महाविद्यालयाच्या संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘कला अंगण’ (डिस्प्ले स्ट्रक्चर) गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊन देखील त्याच्या अनावरणाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ही वास्तू अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे.
विद्यार्थ्यांच्या कलांना चालना मिळावी यासाठी सर जे. जे कला महाविद्यालयाच्या संकुलात ‘डिस्प्ले स्ट्रक्चर’ गेल्या महिनाभरापासून उभारण्यात आला आहे. जे. जे. संकुलात प्रवेश केल्यानंतर येथे उभारण्यात आलेला डिस्प्ले स्ट्रक्चर नजरेस पडतो. संकुलाबाहेरून जाणाऱ्यांनाही तो दिसावा, अशा पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आलेली आहे. हा डिस्प्ले अनावरणाच्या पाटीसह तयार आहे. या अनावरणाची पाटी सध्या झाकून ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठी हे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम करण्यात आले असून, याद्वारे कलामहाविद्यालयात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती लावण्यात येणार आहे.
जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलांचे सादरीकरण या डिस्प्लेद्वारे केले जाणार असल्याची माहिती जे. जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी दिली. या स्ट्रक्टरचे अनावरण जून महिन्याच्या शेवटपर्यंत होणे अपेक्षित होते, पण काही परवानगींमुळे हा प्रकल्प रखडला गेला असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी उभारलेला हा डिस्प्ले स्ट्रक्चर परवानग्यांच्या अभावी रखडला असून, जुलै महिन्यात तरी अनावरण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
>झाड कोसळल्याने वाहतूककोंडी