‘व्हिजन आॅफ आर्ट’मध्ये कलासंगम
By admin | Published: May 18, 2016 02:22 AM2016-05-18T02:22:55+5:302016-05-18T02:22:55+5:30
‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले
मुंबई : जहांगीर कला दालनात आयोजित ‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या समूह कला प्रदर्शनात चित्र आणि शिल्पांचा अनोखा मेळ साधण्यात आला आहे.
‘व्हिजन आॅफ आर्ट’ या समूह कला प्रदर्शनात संदीप पाटील, सुषमा अदाते, किरण अदाते यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. याप्रसंगी, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी या कलाकृती पाहून कलाकारांना मनमुराद दाद दिली. शिवाय, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
वांद्रे रहेजा महाविद्यालयातून कलेचे शिक्षण पूर्ण करणारे संदीप पाटील गेली नऊ वर्षे कला अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रदर्शनात समुद्र पाऊस, प्रतिबिंब अशा विविध विषयांवर संदीप यांनी चित्रे रेखाटली आहेत. या चित्रातील रेखाटन कला रसिकांचे लक्ष वेधत आहे. सुषमा अदाते यांनी ‘गॉसिप’ या विषयावर शिल्पे साकारली आहेत. याकरिता, धातूचा वापर करून अत्यंत वैविध्यपूर्ण पद्धतीने ही शिल्पे साकारली आहेत. सुषमा यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट या संस्थेतून कला शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या माहीम येथील एका खासगी शाळेत त्या कलेचे अध्यापन करतात. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली ही धातूची शिल्पे वेगवेगळ्या दृश्यांमध्ये गॉसिपिंग करताना आढळतात. त्यात वर्तमानपत्र-पुस्तक वाचताना रंगणारे गॉसिप, कट्ट्यावरचे गॉसिप अशा वेगवेगळ्या दृश्यांना शिल्परूपात साकारले आहे. किरण अदाते यांनी ‘जर्नी आॅफ लाइफ’ या विषयावर शिल्पे साकारली आहेत. यासाठी दगडाचा वापर करून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ममता या भावनांना मूर्त रूपात साकारले आहे. ‘व्हिजन आॅफ आर्ट’ हे कलाप्रदर्शन जहांगीर कलादालनाच्या आॅडिटोरिअम सभागृहात २३ मेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. (प्रतिनिधी)