भविष्यात अपत्य प्राप्ती कृत्रिम गर्भातून
By admin | Published: April 2, 2017 11:34 PM2017-04-02T23:34:40+5:302017-04-02T23:34:40+5:30
कृत्रिमरीत्या गर्भधारणा हा वैद्यकीय क्षेत्रातील एतिहासिक क्षण मानला जातो आता त्याही पुढे जाऊन कृत्रिम गर्भाशयच विकसित करण्याचे संशोधन काही देशांत सुरू आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 : कृत्रिमरीत्या गर्भधारणा हा वैद्यकीय क्षेत्रातील एतिहासिक क्षण मानला जातो आता त्याही पुढे जाऊन कृत्रिम गर्भाशयच विकसित करण्याचे संशोधन काही देशांत सुरू आहे. त्यामुळे वंध्यत्वावर मात करणे शक्य होणार असल्याची माहिती प्रसिद्ध एम्ब्रिआॅलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश पै यांनी येथे दिली.
दि नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक्स अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्यावतीने (एनओजीएस) आयोजित परिसंवादात ते बोलत होते. पै म्हणाले, गर्भधारणेत महत्त्व असलेल्या स्पर्म आणि एग्जमध्ये आमूलाग्र संशोधन सुरू आहे. या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीककडे संक्रमित होणारे जनुकीय दोष देखील दूर करण्यावर सखोल संशोधन सुरू आहे, असेही ते म्हणाले. सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, गुणसूत्रातील दोषामुळ अनेक आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. प्रगत वैद्यक तंत्रामुळे गुणसूत्रातील हा नेमका दोष दूर करता येऊ शकतो. या दिशेने देखील जगभरातील संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे जनुकीय दोष घेऊन जन्माला येणाऱ्या बाळांचे दोष दूर करणे शक्य होणार आहे. सोसायटीच्या नवनियुक्त सचिव डॉ. वर्षा ढवळे म्हणाल्या, काही देशांमधील महिला वयाच्या २० व्या वर्षीच आपले एग्ज संरक्षित करून ठेवतात. ज्याववेळी आई होण्याची इच्छा असेल तेव्हा पुरुषांच्या स्पर्मची मदत घेऊन गर्भधारणा करतात. हा अत्यंत खर्चिक उपचार असल्याने आपल्याकडे तूर्तास तरी अशी सोय नाही. मात्र भविष्यात असे होऊ शकते.