एक्सप्रेस वेच्या 'गोल्डन अवर्स'साठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी
By admin | Published: September 18, 2016 06:56 PM2016-09-18T18:56:26+5:302016-09-18T19:02:35+5:30
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. १८ (वार्ताहर) - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे आज एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी नव्हती. मात्र, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमय होते, असं उलटं चित्र पहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या रांगा दोन ते तीन किमी अंतरापर्यत गेल्यानंतर मात्र महामार्ग पोलीसांची तारांबळ उडाली व सर्व फौजफाटा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दाखल झाला. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच या मार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी 3 वाजता झालेली ही वाहतूक कोंडी तीन तासांनंतरही कायम असून जवळपास 3 किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली सकाळी व संध्याकाळी काही तास एक्सप्रेस वेवरील अवजड वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक कसलेही नोटिफिकेशन न काढता ऐवढा मोठा निर्णय महामार्ग पोलीसांनी कशाच्या आधारे घेतला हा वेगळा मुद्दा असला तरी महामार्ग पोलीसांच्या या गोल्डन अवर्स संकल्पनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर कमालीची वाहतूक कोंडी होऊ लागली असून त्यांचा त्रास स्थानिक नागरिक, वाहतूकदार व चाकरमन्यांना होऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी एक्सप्रेस वेची निर्मीती करण्यात आली असताना आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबवत कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जाऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील अपघात व कोंडी रोखण्यात महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे ते अपयश लपविण्यासाठी ही अनोखी शक्कल महामार्ग पोलीसांनी लढवली असल्याची टीका आजची वाहतूक कोंडी पाहून नागरिकांनी केली आहे. याबाबत खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पण एकंदरीतच पोलीसांची ही शक्कल त्यांच्या अंगलट आली असून त्यांचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना भोगावा लागतो आहे.