कलाकार आजन्म कलेसाठीच झटतो

By admin | Published: May 21, 2016 12:48 AM2016-05-21T00:48:42+5:302016-05-21T00:48:42+5:30

कलाकार प्रत्येक क्षणाला कला जगत असतो. त्याला मिळणारी प्रसिद्धी अत्यंत क्षणिक असते.

Artist Ajantham is looking for art | कलाकार आजन्म कलेसाठीच झटतो

कलाकार आजन्म कलेसाठीच झटतो

Next


पुणे : कलाकार प्रत्येक क्षणाला कला जगत असतो. त्याला मिळणारी प्रसिद्धी अत्यंत क्षणिक असते. त्यामुळे प्रसिद्धीच्या हव्यासापेक्षा बालकलाकारांवर कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलावंत आतून व्यक्त झाला, की रसिक हमखास दाद देतात. कलाकाराला भाषा, देशाचे बंधन नसते. कुटुंबाच्या, मायबाप प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर तो कलेवर आजन्म प्रेम करतो. मलाही कलेचे जतन करतच मरण यावे, असे मत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने व्यक्त केले.
नटरंग अ‍ॅकॅडमीतर्फे यंदाचा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार क्रांती रेडकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, मधू कांबीकर, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, जतिन पांडे, संस्थेचे पदाधिकारी ललित जैन, गिरिजा बापट, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, दिलीप काळोखे, धनंजय जाधव, बाळासाहेब दाभेकर, महेश लडकत आदी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, ‘‘कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मेहनत, सचोटी आणि जिद्दीच्या जोेरावर यश मिळवणाऱ्या क्रांतीसारख्या कलाकारांचे कौतुक वाटते. प्रेक्षकांना पडद्यावर कलाकार कला सादर करताना दिसतात; पण यासाठी पडद्यामागे बरीच मेहनत घ्यावी लागते. कलाक्षेत्राचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. मेहनती कलाकारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच भविष्यातील कलाकारांची पिढी घडू शकते.’’
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दादा पासलकर, कांचन अधिकारी आदी मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. अथर्व कर्वे आणि वैष्णवी गिरे यांनी सूत्रसंचालन केले. किरण सरदेशपांडे यांनी प्रास्ताविक केले. जतिन पांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Artist Ajantham is looking for art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.