अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:27 AM2023-12-28T05:27:38+5:302023-12-28T05:27:55+5:30

देभरातील २० उत्कृष्ट चित्रकारांकडून मंदिर परिसरातील भिंतीवर श्रीराम, लक्ष्मण, हनुमानासह विविध चित्रे रंगविण्यात येणार आहेत.

artist from paithan will draw ramayana in ayodhya special invitation to 20 painters from all over the country | अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

दादासाहेब गलांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) :  अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तेथील भिंतीवर चार दिवस विविध चित्रे रेखाटण्यासाठी पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सोमनाथ बोठे यांना निमंत्रित करण्यात आले आहे, ही मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे. 

अयोध्या येथे २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अभूतपूर्व सोहळ्यापूर्वी देभरातील २० उत्कृष्ट चित्रकारांकडून येथील मंदिराच्या परिसरातील भिंतीवर श्रीराम, लक्ष्मण, हनुमानासह विविध चित्रे रंगविण्यात येणार आहेत. देशभरातील २० उत्कृष्ट चित्रकारांमध्ये तेलवाडी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सोमनाथ बोठे यांचा समावेश असून, त्यांना यासाठी निमंत्रण आले आहे.  

बालपणीच लागला चित्रकलेचा छंद  

बोटे यांच्या  घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे  लहानपणापासूनच त्यांना देवी-देवतांचे चित्र काढण्याचा छंद  होता. पुढे काही दिवस दुकानात काम करताना त्यांनी स्थानिक चित्रकारांच्या हाताखाली ही कला विकसित केली. पुणे येथे चित्रकलेतील उच्च शिक्षणातील पदवी घेतली. त्यांनी आजवर निसर्ग, भारतीय संस्कृती, पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक वास्तू, घाट यांची चित्रे रेखाटली आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन देशासह विदेशांतही भरविण्यात आले आहे. गेल्या २२ वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करीत आहेत.  

ग्रामीण भागातून  आंतरराष्ट्रीय चित्रकारापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत. राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय असे १५ पुरस्कार मिळाले आहेत. पहिल्यापासूनच धार्मिक चित्र काढण्याची आवड होती. श्रीरामाचे  चित्र काढायला मिळणार, हे माझे भाग्य समजतो. १८ ते २२ जानेवारीपर्यंत अयोध्या येथे मंदिर परिसरातील भिंतीवर चित्र काढणार आहे. - सोमनाथ बोठे, चित्रकार, तेलवाडी, ता. पैठण.
 

Web Title: artist from paithan will draw ramayana in ayodhya special invitation to 20 painters from all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.