चित्रकार गायतोंडेंवरील ग्रंथातून केली इंग्रजी ग्रंथासाठी उचल - सतीश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 05:07 PM2016-09-19T17:07:22+5:302016-09-19T17:07:22+5:30

नाईक यांच्या पुस्तकातून मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व मजकूर चोरून तो Sonata Of Solitude : Vasudeo Santu Gaitonde या इंग्रजी ग्रंथात वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Artist Gaitonde's book written for the English language - Satish Naik | चित्रकार गायतोंडेंवरील ग्रंथातून केली इंग्रजी ग्रंथासाठी उचल - सतीश नाईक

चित्रकार गायतोंडेंवरील ग्रंथातून केली इंग्रजी ग्रंथासाठी उचल - सतीश नाईक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - गायतोंडे ग्रंथासाठी वापरलेल्या दोन्ही मुखपृष्ठांची छायाचित्रे आणि  गायतोंडे यांची सुमारे ४५ दुर्मिळ छायाचित्रे तसेच ग्रंथातील जवळ जवळ २७-२८ परिच्छेद यांची उचलेगिरी केल्याचा आरोप करत लेखक, पत्रकार व चित्रकार सतीश नाईक यांनी ठाण्याच्या नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्या पुस्तकातून मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व मजकूर चोरून तो  Sonata Of Solitude : Vasudeo Santu Gaitonde या इंग्रजी ग्रंथात वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रख्यात हिंदी लेखक व रझा फाउंडेशनचे अशोक बाजपेयी (जे या ग्रंथाचे सहप्रकाशक आहेत ) बोधना आर्ट्स अँड रीसर्च फाउंडेशनच्या संचालिका व प्रकाशिका जेसल ठक्कर, लेखिका मीरा मेनंझीस,  संपादक जेरी पिंटो  इत्यादींच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी परवानगीखेरीज मजकूर वापरल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याची नाईक यांची तक्रार आहे.
नाईक यांनी मांडलेली कैफियत अशी आहे...
गायतोंडे यांच्यावरची एकच पुरवणी काढून मी थांबलो नाही. नंतरची  सुमारे दोन - तीन वर्ष सलग प्रयत्न करून २००६ साली मी त्यांच्यावरचा गायतोंडेंच्या शोधात, हा विशेषांक प्रसिद्ध केला. जो प्रचंडच गाजला. हे कमी पडलं म्हणून की काय २००७ साली गायतोंडे यांच्यावर आणखीन एक विशेष पुरवणी मी प्रसिद्ध केली. या दोन्ही अंकांमुळे केवळ मराठी भाषिकांनाच नव्हे तर भारतातील अन्य भाषिकांना देखील गायतोंडे यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागली.
पण गायतोंडे त्यांच्यावरची सर्वच्या सर्व संदर्भ साधनं जगासमोर आणून दिल्यावर देखील त्यांच्यावरील पुस्तक वा ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी कुणीही प्रकाशक किंवा कुठलंही कलादालन पुढं येईना हे पाहून अखेरीस मीच गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ प्रसिद्ध करायचा निर्णय २००७ - ०८ साली घेतला.
हा ग्रंथ आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मितीमूल्यं लाभलेलाच करायचा असं प्रारंभीचं निश्चित केलं होतं. आणि जवळ जवळ सात - आठ वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर यंदाच्या म्हणजे २०१६ सालच्या जानेवारी महिन्यात हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला.
सुमारे दोन वर्षापूर्वी गायतोंडे ग्रंथ अतिशय दर्जेदार पद्धतीनं प्रसिद्ध व्हावा म्हणून प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या सूचनेवरून मी रझा फाऊंडेशनशी संबंधित असलेले एक सदस्य चित्रकार मनीष पुष्कळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता . त्यावेळी त्यांनी होय, आम्हाला गायतोंडे ग्रंथाच्या इंग्रजी आणि मराठी ग्रंथाला अर्थसाहाय्य करायला निश्चितपणानं आवडेल असं सांगितलं. त्याच वेळी त्यांनी सदर मराठी ग्रंथाची सॉफ्ट कॉपी चित्रकार रझा यांना पाहण्यासाठी म्हणून मेल करावी अशी सूचना देखील केली . त्यानुसार गायतोंडेग्रंथाच्या निर्मितीशी संबंधित चित्रकारसलील साखळकर यांनी दि ०७/०८/२०१४ रोजी गायतोंडे ग्रंथाची सॉफ्ट कॉपी मनीष पुष्कळे ( संदर्भ क्र . ४) यांच्या ईमेल आयडीवर मेल केली . दि २५/०८/२०१४ रोजी माझ्या मेलवरून मी मनीष पुष्कळे यांना अर्थसाहाय्याविषयी विनंती देखील केली . त्यानंतर त्यांच्याशी माझं दोन - तीन वेळा फोनवर बोलणं देखील झालं . एकदा फोनवर चित्रकार रझा स्वतः गायतोंडे ग्रंथाची सॉफ्ट कॉपी वाचत आहेत निर्णय होताच कळवू असंही ते मला म्हणाले. पण त्यांचा फोन काही आलाच  नाही . आणि नंतर अनेक दिवसांनी मी फोन केल्यावर  देखील ते फोन उचलणं ते टाळू लागले. अखेरीस नाईलाजानं एके दिवशी त्यांना वेगळ्याच नंबरवरून फोन केल्यावर त्यांनी तो फोन उचलला आणि रझा फाऊंडेशनकडे पुरेसा फंड नसल्यामुळे अर्थसाहाय्य करता येत नाही. असं उत्तर दिलं आणि फोन ठेऊन दिला. आता रझा फाऊंडेशनकडे पुरेसा फंड नसेल तर त्यांनी माझ्याकडे सॉफ्ट कॉपी का मागितली ? फोन उचलावयास टाळाटाळ का केली ? जर जेसल ठक्कर यांच्या पुस्तकाचे रझा फाऊंडेशन सहप्रकाशक होते तर त्यांनी माझ्या पुस्तकाची प्रत माझ्याकडून का बरं मागवली ? आणि मागवलेली ती प्रत जेसल ठक्कर यांना फॉरवर्ड केली नसेल कशावरून? जेसल ठक्कर यांच्या पुस्तकात चिन्ह मधले अत्यंत दुर्मिळ फोटोग्राफ्स सढळ हाताने वापरलेले दिसतात त्याचं रहस्य हेच नसेल कशावरून ? असे अनेक प्रश्न मला सतावू लागले.
या सगळ्यावरून गायतोंडे या मूळ मराठी पुस्तकाच्या सॉफ्टकॉपीतून इंग्रजी ग्रंथामध्ये मजकूर वापरला असल्याचा नाईक यांचा आरोप असून त्यांनी दोन्ही पुस्तके तक्रारीसोबत सादर केल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, मुंबई मिररने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले असून, त्यानुसार नाईक यांनी केलेले सर्व आरोप जेसल ठक्कर यांनी पायाहीन आणि वाईट हेतूने प्रेरीत असे सांगत फेटाळले आहेत. आम्ही या प्रकल्पावर पाच वर्ष काम केलं असून त्यांसदर्भातली माहिती पुस्तकात दिली असल्याचेही ठक्कर म्हणतात. बोधना आर्ट्स ही कला प्रकाशन क्षेत्रात 10 वर्ष काम करणारी दर्जेदार संस्था असून आवश्यक त्या सर्व मंजुरी आम्ही घेतल्या असल्याचा दावाही ठक्कर यांनी केला आहे. तसेच, तपास अधिकाऱ्यांना सर्व सहकार्य आपण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Artist Gaitonde's book written for the English language - Satish Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.