पिढी घडविण्याचे काम कलावंतांचेच
By Admin | Published: February 14, 2016 01:59 AM2016-02-14T01:59:49+5:302016-02-14T01:59:49+5:30
असहिष्णुतेवरून कलावंतांच्या पुरस्कार वापसीचे प्रकार मध्यंतरी जोरात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मात्र कलावंतांच्या प्रतिष्ठित अशा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी
- अतुल कुलकर्णी, मुंबई
असहिष्णुतेवरून कलावंतांच्या पुरस्कार वापसीचे प्रकार मध्यंतरी जोरात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मात्र कलावंतांच्या प्रतिष्ठित अशा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेला पर्याय नाही, येणारी पिढी उत्तम माणूस म्हणून कशी घडेल, त्यांचा रोबोट तर होणार नाही, यासाठी कलावंतांनाच काम करावे लागेल, असे प्रतिपादन मोदींनी या समारंभात केले.
विविध कलांशी संबंधित मान्यवरांच्या मांदियाळीनेही मोदींच्या या आवाहनाला टाळ्यांचा गजराने जोरदार प्रतिसाद दिला. १२७ वर्षे जुन्या ‘बीएएस’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेला स्वत:ची हक्काची इमारत मिळाली असून, तिचे बांधकाम अशा रीतीने केले आहे की तेथे कुठेही कोपरा नाही. त्याच्या उद्घाटनानंतर मोदी यांनी बराच वेळ दुर्मीळ चित्रे, शिल्पे पाहण्यात घालवला.
कलेला राजाश्रय नको, ती राज्य पुरस्कृत असायला हवी. तिच्यात सामाजिक बदल घडवून आणण्याची ताकद असल्याने ती केवळ घरांच्या भिंतींवर लटकविण्यापुरती मर्यादित न राहता समाजाला विचार करण्यास प्रवृत्त करणारी असावी, असेही मोदी म्हणाले. घरात पाहुणे आले की आई छोट्या मुलाला बोलावून ‘टिष्ट्वंकल टिष्ट्वंकल लिटल स्टार’ कविता म्हणायला लावते. जवळपास सर्व घरांमध्ये हे दिसते. पण आमच्या मुलाने हे पेंटिंग बनवले आहे, असे किती आया सांगताना दिसतात, असे नमूद करून घोकमपट्टीच्या मानसिकतेतून सर्वांनीच पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
येणाऱ्या पिढीला आम्ही रोबोट तर बनवत नाही ना, असा सवाल करून मोदी म्हणाले, माणसाला उत्तम माणूस घडवण्यासाठी कलावंतांचे योगदान मोठे राहणार आहे. पुरस्कार वापसीच्या नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण देत मोदींनी ‘आर्ट’ शब्दाची नवीन व्याख्याच सांगितली. ‘ए’ म्हणजे एजलेस (चिरंतन), ‘आर’ म्हणजे रिजनलेस (प्रांतविरहित) आणि ‘टी’ म्हणजे टाइमलेस (कालातीत) असणारी गोष्ट म्हणजे कला असा अर्थ मोदींनी सांगताच समोर जमलेल्या टाळ्यांचा एकच गजर झाला.
आपल्याविरुद्ध देशभर तयार होत असलेल्या वातावरणाचा कोठेही उल्लेख न करता त्याचे खंडन करणारे प्रतिपादन करणे, याकडे मोदींचे लक्ष होते. एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो, तेव्हा आपण त्याला तू काय दगड फोडतोयस असे म्हणतो. तो मात्र मी दगड फोडत नाही तर मूर्ती घडवतोय, असे सांगतो याचा मोदी यांनी उल्लेख केला, तेव्हाही उपस्थितांनी जोरदार हसून दाद दिली. कलावंतांनी जे काही चित्र तयार केले आहे, ते तयार करतानाची मानसिकता, त्यामागील भूमिका सांगणारी ३-४ मिनिटांची चित्रफीतही तयार करावी म्हणजे त्याने काय बनवले आहे हे सामान्यांच्याही लक्षात येईल असा सल्ला त्यांनी दिला. आता डिजिटल व्हर्जनकडे वळावे लागेल असेही मोदी म्हणाले. रेल्वेच्या फ्लॅटफॉर्मवरही आर्ट गॅलरी सुरू करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
व्यासपीठावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, कामगारमंत्री प्रकाश मेहता आणि बीएएसचे अध्यक्ष वासुदेव कामत यांची उपस्थित होती.
राज्यातही ललित कला अकादमी
केंद्राच्या धर्तीवर राज्यात ललित कला अकादमी स्थापन केली जाईल आणि त्यासाठी जागाही दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली; शिवाय बालकलाकारांना यापुढे ५०० रुपयांऐवजी १० हजार आणि कलाकारांना २५ हजारांऐवजी ५० हजार ते १ लाखापर्यंत पुरस्कार दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.