तमाशा कलावंतांना मिळणार संरक्षण
By Admin | Published: February 24, 2016 03:11 AM2016-02-24T03:11:11+5:302016-02-24T03:11:11+5:30
महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशा, लावणी या लोककला जगल्या पाहिजेत. या दृष्टीने त्यांना आरोग्य व आयुर्विम्याचे संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन
नवी मुंबई : महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशा, लावणी या लोककला जगल्या पाहिजेत. या दृष्टीने त्यांना आरोग्य व आयुर्विम्याचे संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी वाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात दिले.
यावेळी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गंगाराम कवठेकर यांना गतवर्षीचे पुरस्कारप्राप्त भीमराव तोताराम गोपाळ यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पाच लाख रु पये, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांगता समारोपात नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अष्टपैलू कवठेकर
उत्कृष्ट ढोलकीपटू, सोंगाड्या म्हणून कवठेकर लोकप्रिय आहेत. हार्मोनियम, संबळ, ताशावादन व नृत्यातही ते पारंगत आहेत.
गेल्या ३५ वर्षांपासून कवठेकर या क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा तमाशा फड पुणे, अहमदनगर, नाशिक भागात लोकप्रिय होता. ८४ वर्षे वयाचे कवठेकर सध्या नव्या कलावंतांना मार्गदर्शन करीत आहेत.
लोककलावंतांना आॅनलाइन मानधन
राज्य शासनातर्फे लोककलावंतांना मानधन देण्यात येते. मात्र हे मानधन मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागतात. त्यात वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो. यापुढे लोककलावंतांचे मानधन आॅनलाइन देण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.