अरुण अडसड यांना भाजपाची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:13 AM2018-09-23T04:13:03+5:302018-09-23T04:13:17+5:30
विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपाने माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक ३ आॅक्टोबरला होत आहे.
मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपाने माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक ३ आॅक्टोबरला होत आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. फुंडकर हे विदर्भातील जुने नेते होते त्यांच्या जागी त्यांच्याच पिढीचे असलेले अडसड यांना पक्षाने संधी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. फुंडकर यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २४ एप्रिल २०२० ला संपणार होती. त्यांच्या निधनाने रिक्त होत असलेल्या जागेची निवडणूक होत असल्याने नवीन आमदारांचा कार्यकाळही २४ एप्रिल २०२० पर्यंत असेल.
अडसड यांचा प्रवास संघ, जनसंघ आणि भाजपा असा राहिला आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि युतीची सत्ता आली. त्या वेळी त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी केवळ ९७४ मतांनी पराभव केला होता.
पुन्हा भाजपाची सत्ता आली पण अडसड यांना कोणतीही संधी मिळालेली नव्हती. आता विधान परिषदेवर पाठवून पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाचीही चर्चा होती.