विधान परिषदेसाठी अरुण अडसड यांचा अर्ज, निकालाची औपचारिकता शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:06 AM2018-09-25T05:06:43+5:302018-09-25T05:08:37+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी सोमवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी सोमवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अडसड यांनी आज विधानभवनात अर्ज भरला त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री प्रवीण पोटे, खा.रामदास तडस, आ.अनिल बोंडे, आ.अनिल सोले, आ. राज पुरोहित, प्रताप अडसड, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडसड यांचे सूचक होते.
अडसड यांच्या विजयाची औपचारिकता आता बाकी आहे. उद्या अर्जाची छाननी होऊन २६ तारखेला अर्ज मागे घेता येईल आणि अडसड यांचा एकट्याचाच अर्ज असल्याने २७ तारखेला त्यांच्या विजयाची घोषणा केली जाईल. अडसड यांच्या रुपाने भाजपाने जुन्याजाणत्या नेत्याला आमदारकी दिली आहे.
इथेही जगताप !
अडसड यांच्याविरुद्ध अर्ज भरायचा आहे असे म्हणत पुण्याचे सतीश विठ्ठल जगताप विधानभवनात आले. ‘मी वर्षावरुन मुख्यमंत्र्यांना भेटून आलो आहे, त्यांनी मला अर्ज भरायला सांगितले आहे’ असे जगताप यांनी मंत्री गिरीश बापट यांना सांगितले. विधान परिषद निवडणूक म्हटली की बरेचदा जगताप असे अचानक येऊन या त्या नेत्याचे नाव सांगत असतात. आज मंत्री गिरीश बापट यांनी समजूत काढल्यानंतर जगताप निघून गेले.