कुमार गंधर्वांनी शिकविले गाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:42 AM2018-05-07T04:42:55+5:302018-05-07T04:42:55+5:30
मराठी भावसंगीतातील धु्रवतारा ठरलेला शुक्रतारा हा कार्यक्रम सादर करणारे, मराठी भावसंगीताला गेली सहा दशके बहराला आणणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
- नंदकुमार टेणी
अरुण दातेंचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले गाणे खुद्द कुमार गंधर्वांनी शिकविले. त्या काळी सोळा, सतरा वर्षांचे दाते उत्तम ड्रायव्हिंग करीत. कुमारांना देवासहून इंदोरला यायचे असले की दाते यांचे वडील रामूभैय्या त्यांना सांगत. अरु बेटा जा, कुमारला देवासहून घेऊन ये. कुमार आणि त्यांच्या सौभाग्यवती पाठिमागच्या सीटवर बसत आणि अरुण आपल्याच धुंदीमध्ये आवडती गाणी गुणगुणत सुसाट ड्रायव्हींग करीत असत. एकदा कुमार त्यांना म्हणाले अलीकडे तू फार छान गुणगुणतोस तुझा आवाजही चांगला आहे. चल मी तुला गाणे शिकवितो. तसा अरुण घाबरला. नाही हो, मला काय गाणेबिणे येत नाही. मी आपला उगाच विरंगुळा म्हणून गुणगुणत असतो. पण कुमारांनी त्याचे ऐकले नाही. ते त्याला समोर घेऊन बसले आणि त्याला त्यांनी उर्दू गझल म्हणायला शिकवली. विशेष म्हणजे अरुणला शिकविण्यासाठी ते स्वत: ती गझल शिकले होते. आयुष्यात त्यांनी गायलेली ती पहिली गझल.
पु.लं.चा आशीर्वाद
ज्या कॉलेजमध्ये अरुण शिकत होता त्या कॉलेजच्या स्रेहसंमेलनास पु.लं. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. संमेलनाच्या दिवशी सकाळी ते कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी विचारले की, तुमच्यापैकी चांगला कोण गातो. त्यावर त्या मुलांनी काहींची नावे सुचविली. त्यांचे गाणे ऐकल्यावर पु.लं. नी विचारले यांच्यापेक्षा चांगले कोणी गातो का? त्यावर त्यांनी त्यांना लांब उभे असलेल्या अरुणचे नाव सांगितले. पु.लं.नी त्यांना बोलाविले आणि सांगितले मला तुझे गाणे ऐकव. त्यावर तो आढेवेढे घेऊ लागला. तुझे नाव काय रे असे विचारल्यावर त्याने दाते आडनाव सांगताच तू रामूभैय्यांचा कोण? असा सवाल त्यांनी केला. तेव्हा मी त्यांचा मुलगा असे उत्तर मिळताच पु.ल. खुश झाले.
कार्यक्रम संपला दुसऱ्या दिवशी सकाळी पु.लं. नी रामूभैय्यांना विचारले तुमच्या घरात जबरदस्त गायक आहे. त्याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अख्ख्या दुनियेतल्या गायकांचे गोडवे गातात. त्यांचे गाणे ऐकतात. या घरतल्या गायकाकडे का दुर्लक्ष करतात? त्यावर ते चकित होऊन म्हणाले आमच्या घरात आणि गायक? कोण ? अरे आपला अरु. बसा, व ऐका त्याचे गाणे असे म्हणून पु.लं. नी दातेंना वडिलांसमोरच गायला लावले. तेव्हापासून आपला पुत्र सुरेख गातो याची वडिलांची खात्री पटली.
परिसस्पर्श झाला
एक दिवस यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांनी अरुण दाते यांचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकून खळे हर्षभरीत झाले. या गायकाला आपण संधी दिली पाहिजे असे ते म्हणाले. मग त्या दोघांनी दाते यांचा मुंबईतील पत्ता मिळाला त्यावर खळे आणि देव यांनी त्यांच्या नावे आकाशवाणीचे एकूण ८ कॉन्ट्रॅक्ट पाठविले. परंतु तरी उत्तर आलेच नाही. तेव्हा खळे एक दिवस त्यांच्या त्या मुंबईतील पत्त्यावर जाऊन धडकले. घरात गेल्यावर समोर पाहता तो साक्षात रामूभैय्या दाते उभे. तुम्ही इकडे कुठे? अशी विचारणा त्यांनी केली. अहो, तुमच्या अरुणला आकाशवाणी मुंबई केंद्राने कॉन्ट्रॅक्ट पाठविली परंतु त्याने उत्तरच दिले नाही. म्हणून मीच आलो असे खळेंनी सांगताच रामूभैय्यांनी प्रश्न केला अरु, तू का उत्तर पाठविले नाहीस. त्याने सांगितले आपण इंदौरकडची माणसं. पुण्या मुंबईचे लोक आपल्या मराठीची खिल्ली उडवितात.त्यावर खळे म्हणाले तुमच्यासाठी माझ्याकडे एक गीत आहे आणि ते तुम्हीच गायले पाहिजे. असा माझा अट्टाहास आहे. त्यावर रामूभैय्यांनी अरुला ते गाणे गाण्याची सूचना केली. सुधा मल्होत्रा व अरुण दाते यांनी आकाशवाणी मुंबईसाठी शुक्रतारा मंदवारा हे गीत गायले.
शुक्रताराने केले नामांतर
शुक्रतारा या गीताचे रेकॉर्डींग झाले आणि प्रसारणाच्या आदल्या दिवशी त्याची अनाउन्समेंट रेकॉर्ड करण्याचे काम सुरू होते. कमालीनी विजयकर या अनाउन्सर होत्या. त्यांनी या गीताची कागदपत्रे पाहिली तेव्हा गायक ए.आर. दाते असा उल्लेख होता. त्यांनी यशवंत देवांना फोन केला. की या गायकाचे नाव काय. कारण नियमानुसार नाव आणि आडनाव अशी उद्घोषणा करावी लागते. त्यावर देव म्हणाले मी खळेंना विचारून सांगतो. त्यांनी खळेंना फोन केला. तेव्हा ते म्हणाले अरे मलाही माहित नाही. पण मी त्याच्या घरी गेलो तेव्हा सगळे त्याला अरु अरु म्हणत होते. त्यामुळे बहुधा अरुण असावे असे मला वाटते. तेव्हा यशवंत देवांनी सांगून टाकले मॅडम तुम्ही अरुण दाते असे नाव उद्घोषणेत समाविष्ट करून टाका. दाते यांना उद्या आपण गायलेले गाणे प्रसारित होणार हे माहिती होते. म्हणून ते उत्सुकतेने उद्घोषणाही ऐकत होते. परंतु अरुण दाते हे गायकाचे नाव ऐकल्यावर ते चकीत झाले. कदाचित दुसरा कोणी गायक असावा काय असा प्रश्न त्यांना पडला. पण गाणे तर तेच होते. त्यांनी गाणेही ऐकले. ते त्यांच्याच आवाजात होते. मग त्यांनी यशवंत देवांना फोन केला आणि सांगितले अहो, माझे नाव अरुण नसून अरविंद दाते आहे. तेव्हा सुधारणा करा त्यावर पुढच्या वेळेला नक्की करू असे देव म्हणाले परंतु शुक्रताराने एवढी लोकप्रियता मिळवली की त्यांचे अरविंद नाव विसरून अरुण दाते होऊन गेले.
(लेखक हे लोकमतच्या ठाणे आणि पालघर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)