अरुण गवळीला १५ दिवसांची पॅरोल
By admin | Published: May 1, 2015 02:27 AM2015-05-01T02:27:04+5:302015-05-01T02:27:04+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कुख्यात डॉन अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी १५ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कुख्यात डॉन अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी १५ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. न्यायमूर्ती अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी हा निर्णय दिला. रजेदरम्यान प्रत्येक दुसऱ्या दिवशी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, असे निर्देश गवळीला देण्यात आले आहेत.
महेश गवळीचे ९ मे रोजी मुंबईत लग्न आहे. गवळीला काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता. गवळीला पॅरोलवर सोडल्यास दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाविरुद्ध गवळीने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आली. (प्रतिनिधी)