अरुण गवळी नागपूर कारागृहात
By admin | Published: March 17, 2015 01:08 AM2015-03-17T01:08:56+5:302015-03-17T01:08:56+5:30
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.
नागपूर : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे.
मुंबईत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी गवळीसह ११ जणांना मोक्का विशेष न्यायालयाने २४ आॅगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची ही घटना २ मार्च २००७ ला घडली होती. जन्मठेप झाल्यापासून गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. खून, खंडणी वसुली, दंगल घडविणे, आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध पोलिसात दाखल आहेत. गवळी हा तळोजा कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीच्या जीवनावर ‘डॅडी’ नावाचा चित्रपट बनत आहे. या चित्रपटात डॅडीची भूमिका वठविणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने इस्पितळात गवळीची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीने वादळ उठले होते. (प्रतिनिधी)