अरुण साधू यांची प्रकृती चिंताजनक, सायन रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:58 PM2017-09-24T20:58:59+5:302017-09-24T20:59:09+5:30
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई, दि. 24 - साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सकाळी १०च्या सुमारास प्रकृती बिघडल्याने साधू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
साधू यांचे वय ७५ असून त्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. आता त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली. मराठी साहित्य विश्वात राजकीय कादंब-या फारशा नसताना अरुण साधू यांनी आपल्या कादंब-यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले.