अरुणा शानबाग यांची प्रकृती जैसे थे!
By admin | Published: May 18, 2015 04:22 AM2015-05-18T04:22:24+5:302015-05-18T04:22:24+5:30
अरुणा शानबाग या त्यांच्यावर केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत असल्या तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. अजूनही त्यांच्यावर
मुंबई : अरुणा शानबाग या त्यांच्यावर केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत असल्या तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. अजूनही त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून व्हेंटिलेटर काढलेला नाही.
पाच दिवसांपूर्वी अरुणा यांना न्युमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. श्वासोच्छ्वास घ्यायला त्यांना त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार येत आहेत, पण तितकेसे गंभीर स्वरूपाचे नाहीत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
गेली ४२ वर्षे अरुणा यांच्यावर केईएम रुग्णालयातील ४ ए वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. १९७३ मध्ये वॉर्डबॉयने केलेल्या अत्याचारानंतर त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या आहेत. अतिदक्षता विभागात ४ ते ५ डॉक्टरांचे युनिट आणि ३ ते ४ परिचारिका कार्यरत असतात. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अरुणा यांची काळजी घेत आहेत.
(प्रतिनिधी)