मरन्या डोये खून प्रकरणी अरुणाचलप्रदेश पोलीस रायगडमध्ये
By Admin | Published: June 2, 2016 05:16 PM2016-06-02T17:16:01+5:302016-06-02T17:54:28+5:30
गेल्या 26 एप्रिल रोजी भरदिवसा दुपारी महाड बिरवाडी एमआयडीसी मधील नांगलवाडी फाटा येथील साईसिद्धी इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यालयात स्वागतिका म्हणून नोकरी करणा-या
>- जयंत धुळप
अलिबाग, दि. 2 - गेल्या 26 एप्रिल रोजी भरदिवसा दुपारी महाड बिरवाडी एमआयडीसी मधील नांगलवाडी फाटा येथील साईसिद्धी इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यालयात स्वागतिका म्हणून नोकरी करणा-या मुळ अरुणाचलप्रदेशातील सेरेन-पासीघाट येथील रहिवासी असलेल्या मागासवर्गीय मरन्या डोये या 22 वर्षीय युवतीच्या खून प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या माध्यमातून सूरु असलेल्या तपासाची पहाणी करण्याकरीता अरुणाचल पोलीस रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
मरन्या डोये हिच्या खूनाचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याची भावना तिची मोठी बहिण अभिनेत्री व चित्रपट निर्माती मरिना डोये हीने व्यक्त केल्यावर, त्याची अरुणाचलप्रदेश सरकारच्या गृह मंत्रलयाने अत्यंत गांभीर्याने दखल घेवून,अरुणाचलप्रदेशच्या गुन्हे आणि विशेष तपास यंत्रणोचे पोलीस अधिक्षक आर.के.ख्रिमे यांना रायगड पोलीसांकडून होत असलेल्या या प्रकरणाच्या तपास प्रगतीचा आढावा घेवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या मंगळवारी अरुणाचलप्रदेशच्या गुन्हे आणि विशेष तपास यंत्रणेचे पोलीस अधिक्षक आर.के.ख्रिमे व वरिष्ठ पोलीस निरिक्षक मृणाल डे यांनी मृत मरन्या डोये हिची मोठी बहिण मरिना डोये आणि डोये कुटूंबीयांचे निकटवर्ती तथा उत्तराखंड मधील कोर्टद्वार येथील सुप्रसिद्ध कण्व ऋषी आश्रमाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव राजेश रजपूत यांच्यासह प्रथम अलिबाग मध्ये येवून अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्या समवेत तपास प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच, महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी फाटा येथील साईसिद्धी इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यालयात जावून घटनास्थळाची पहाणी केली. बिरवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नंदकुमार सस्ते यांच्या समवेत देखील तपासातील बाबींविषयक चर्चा करुन माहिती घेतल्याचे अरुणाचलप्रदेशच्या गुन्हे आणि विशेष तपास यंत्रणोचे पोलीस अधिक्षक आर.के.ख्रिमे यांनी बिरवाडी येथे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रायगड पोलीसच तपास पूर्ण करणार
अरुणाचलप्रदेश राज्याच्या जनतेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील विषय असून या खूनाचा तपास हा रायगड पोलीसच करणार आहेत. आम्ही त्यांच्या तपास प्रक्रीयेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही. केवळ तपासाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, याचा अहवाल आमच्या गृह विभागास अपेक्षित असल्याने त्याकरीता आम्ही येथे आलो असल्याचे पोलीस अधिक्षक आर.के.ख्रिमे यांनी सांगितले.
अरुणाचल-महाराष्ट्र राज्यपालांच्या भेटीअंती तपास गतीमान
मरन्या डोये हिच्या खूनाअंती तिचा मृतदेह सेरेन-पासीघाट या तिच्या मुळ गावी नेल्या नंतर संपूर्ण अरुणाचलप्रदेशातील सनसामान्यांमध्ये या घटनेबाबत तिव्र निषेध भावना निर्माण झाली. त्यांतून संपूर्ण राज्यात उत्स्फूर्त जनआंदोलने झाली. या सा-या जनभावनांची विशेष दखल घेवून, अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल जे.पी.राजखोवा यांनी मुंबईत येवून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची गेल्या 4 मे रोजी राजभवनात भेट घेतली आणि या खूनप्रकरणाची माहिती देवून या प्रकरणी सखोल तपास व कार्यवाहीची मागणी केली.
महाडच्या विसावा हॉटेलमध्ये प्रशिक्षणाकरिता आम्ही दोघी बहिणी
अरुणाचल प्रदेशातील सेरेन-पासीघाट येथील आम्ही तिघी भगिनी आहोत. मरन्या व मार्टर या दोघी बहिणींनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स दिल्ली येथून पूर्ण केला. त्याच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी त्या दोघी महाड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या विसावा रिसॉर्टमध्ये दाखल झाल्या. प्रशिक्षण पूर्ण करुन त्या तेथेच नोकरी देखील करु लागल्या. महाड येथील एमआयडीसीमध्ये साईसिद्धी इंजिनिअरिंग कंपनीचे मालक सचिन पवार हा चहा-पान व भोजनासाठी वरचेवर विसावा हॉटेलामध्ये येत असत. तेथे त्यांचा मृत मरन्याशी परिचय झाला. तु माझ्या कंपनीत स्वागतिका म्हणून ये, तुला महिना 2 ते 4 हजार पगार देईन,असे पवारने तिला सांगितले. मरन्या हीने पवार यांच्या कंपनीमध्ये नोकरी सुरु केली, अशी माहिती मृत मरन्या डोये हिची मोठी बहिण मरिना डोये हिने दिली.
सचिन पवार कडे मोठय़ा प्रमाणात पैसे येतात, माझे मन रमत नाही
मृत मरन्या आपल्या करिअर बद्दल तेथील बहिण मार्टर हिच्याशी फारशी बोलत नसे. सचिन पवार कडे मोठय़ा प्रमाणात पैसे येतात. त्याच्या कंपनीचे नाव इंजिनिअरींग असले तरी तो पांढ-या पावडरचा धंदा करतो, माङो मन तेथे रमत नाही. मी दिल्लीला जाऊ न नोकरी शोधणार आहे असे ती आम्हाला सांगत असे.पण आम्ही ते त्यावेळी गांभीर्याने घेतले नाही, आणि आज आम्ही आमची बहिण गमावून बसलो आहेत,अशी दु:खद कहाणी मरिना हिने पूढे सांगितली.
प्रचंड पैशाच्या बळावर सचिन पवार याने सर्वांची तोंडे बंद केल्याचा आरोप
घटना घडली, तेथून जवळच बिरवाडी एमआयडीसी पोलीस ठाणे आहे. पण सर्वानी या निर्घृण हत्येकडे दुर्लक्ष केले. प्रचंड पैशाच्या बळावर सचिन पवार याने सर्वाची तोंडे बंद केल्याने या खुनाची फार वाच्चता झाली नसल्याचे मरिना हीने सांगित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच स्वत: गृहमंत्री असल्याने सचिन पवारच्या पाठीराख्यांचा शोध घ्यावा आणि त्यांनाही शासन करावे अशी मागणी तिने केली आहे.
गुन्हा अनेकांवर पण फक्त सचिन पवारला अटक
पहिले 8 ते 10 दिवस आकस्मिक मृत्यू अशी नोंद करणा:या बिरवाडी पोलीसांकडे मी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर सचिन पवार, त्याची पत्नी व कर्मचारी यांच्यावर भा.द.वि.कलम 302 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सचिन पवार याचा एकटय़ालाच आता र्पयत अटक केले आहे, बाकीचे समाजात मोकाटपणो फिरत आहेत याचे दूख्:ा वाटत असल्याचे सांगून, मरन्यास ज्या शस्त्रने ठार मारले ते शस्त्र आणि तिचा मोबाईल कुठे आहे याचा तपास होणो आवश्यक आहे.सचिन पवारचे हाताचे ठसे देखील चौकशी अधिका-याने घेतलेले नाहीत. चौकशी अधिकारी या चौकशीत त्रृटी का ठेवतात आणि परप्रांतातून आलेल्या या तरुणीला महाराष्ट्रात सुरक्षितता का मिळू नये, असा सवालही तिने केला आहे.
मानवाधिकार आयोगाकडेही मागितली दाद
अरुणाचल प्रदेशात हे प्रकरण फार धुमसत आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे.पी.राजखोवा यांनी मुंबईत येवून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेवून हे प्रकरण दडपले जाऊ नये अशी विनंती केली असल्याचे मरिना हिने सांगीतले. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे लाखो लोकांनी कँडेल मार्च काढून, महाराष्ट्र सरकारने अपराध्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. पूर्वाचलातून महाराष्ट्रात कामास येणा:यांना सुरक्षितता द्यावी अशीही मागणी केली, असल्याचे तिने सांगीतले. आम्ही डोये कुटुंबीय मागासवर्गीय (एससीएसटी) समाजाचे असल्याने सचिन विरुद्ध आम्ही अरुणाचल प्रदेश मध्येही तक्रार केली असून मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागीतली असल्याचे तिने अखेरीस सांगितले.