अरुणाचा अविरत लढा सुरु आहे !
By admin | Published: August 3, 2014 02:41 PM2014-08-03T14:41:54+5:302014-08-03T14:41:54+5:30
अरुणा शानबाग... आयुष्याशी झुंज देणारी लढवय्यी... ४०हून अधिक वर्षांपासून केईएम रुग्णालयात ती हा लढा देतेय... या लढ्यात बळ देणाऱ्या परिचारिका मैत्रिणी आता तिचं कुटुंब झाल्या आहेत.
अरुणा शानबाग... आयुष्याशी झुंज देणारी लढवय्यी... ४०हून अधिक वर्षांपासून केईएम रुग्णालयात ती हा लढा देतेय... या लढ्यात बळ देणाऱ्या परिचारिका मैत्रिणी आता तिचं कुटुंब झाल्या आहेत. त्यांना अरुणाचं दु:ख समजतं.. म्हणूनच अरुणाचं संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी केला. दुसरीकडे दयामरणास ठाम नकार असणाऱ्या या परिचांरिकांचे हे शुश्रूषाव्रत आजही अखंड सुरू आहे. या परिचारिकांचे नेतृत्व करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या अधिसेविका अरुंधती वेल्हाळ यांच्याशी स्नेहा मोरे यांनी केलेली ही बातचीत...
--------------------
जगण्याची जिद्द बाळगणाऱ्या अरुणाचा गेल्या ४०हून अधिक वर्षे मृत्यूशी अविरत लढा सुरू आहे. अरुणा ड्युटीवर असताना तो प्रसंग ओढवल्याने आता ती सर्वस्वी आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारून आम्ही अरुणाची काळजी घेत आहोत, अखेरपर्यंत घेऊ, असे अरुंधती वेल्हाळ यांनी सांगितले.
गेली २६-२७ वर्षे अरुणाची देखभाल त्यांच्या देखरेखीअंतर्गत सुरू आहे. अरुणा शानबाग प्रकरणात पिंकी विराणी यांनी दयामरणासाठी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेला परिचारिकांनी तीव्र विरोध केला होता, त्याविषयी सांगताना वेल्हाळ म्हणाल्या, ‘अरुणा आता आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळे आपल्या घरातील सदस्याविषयी असा विचारही करणे कठीण आहे. शिवाय, दयामरणास मंजुरी मिळाल्यास याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ शकतो ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आमचा दयामरणास आजही नकारच आहे.
वैद्यकीय सेवेतील उत्तम परिचर्येचे अरुणा शानबाग हे उदाहरण आहे. या परिचर्येत परिचारिका, विद्यार्थी परिचारिका यांची महत्त्वाची भूमिका आहे. अरुणाची देखभाल करण्याचा आनंद आणि समाधान विशेषत: या विद्यार्थी परिचारिकांच्या डोळ्यांत दिसून येते. अरुणालाही स्पर्शाची जाणीव होते, तिच्या डोळ्यांत आजही जगण्याची इच्छा दिसते. तिच्या डोळ्यांतले हावभाव आमच्याशी संवाद साधतात. आनंद, दु:ख, राग, प्रेम, आवेश या सगळ्या भावना ती आमच्याशी शेअर करते, असे वेल्हाळ सांगताना या परिचारिकांशी अरुणाच्या असणाऱ्या भावनिक बंधाची प्रचितीही आली.
कधीकधी अरुणा रात्रीच्या वेळी किंचाळते, ओरडते त्या वेळी आमच्याही मनात काहीसे धस्स होते, मात्र व्यक्त होण्यासाठी तिचा हाच मार्ग आहे. या माध्यमातून ती आमच्याशी संवाद साधते, असे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी अरुणाला न्यूमोनिया झाला होता, त्या वेळी ती व्हेंटिलेटरवर होती. त्या वेळी पहिल्यांदाच तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र एवढ्या कठीण प्रसंगातही अरुणाची इच्छाशक्ती डगमगली नाही. ती पुन्हा एकदा या सर्वातून सुखरूप बाहेर आली, असे सांगत कितीही संकटे आली तर अजिबात खचायचे नाही हे आम्ही तिच्याकडून शिकलो, असा उल्लेखही वेल्हाळ यांनी केला. आता पुन्हा एकदा दयामरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पण अरुणासाठी ‘दयामरण’ हा शब्ददेखील भूतकाळात गेला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर तिच्या जगण्याने मृत्यूवर प्रत्येक वेळी मिळवलेला विजय हा प्रत्येकासाठीच आदर्श ठरेल याची पूर्ण खात्री असल्याचे सांगत आम्हीही तिच्यासाठी कायमच लढू, असे वेल्हाळ यांनी सांगितले. वेल्हाळ यांच्याशी बोलताना, अरुणाच्या अधांतरी आयुष्याभोवती असलेली नात्यांची वीण अतिशय घट्ट असल्याचे क्षणोक्षणी जाणवले.