अरुणाच्या आठवणींना उजाळा

By admin | Published: May 19, 2016 02:41 AM2016-05-19T02:41:53+5:302016-05-19T02:41:53+5:30

कोणतीही तक्रार न करता, सातत्याने रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Arun's memories are bright | अरुणाच्या आठवणींना उजाळा

अरुणाच्या आठवणींना उजाळा

Next


मुंबई : कोणतीही तक्रार न करता, सातत्याने रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व्यस्त वेळापत्रकात परिचारिकांना दोन क्षण विरंगुळ््याचे मिळावेत, म्हणून अरुणा शानबाग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णालयात परिचारिकांसाठी वाचनालय आणि जिमचे उद्घाटन करण्यात आले. बुधवारी केईएम रुग्णालयात ‘स्मृती अरुणाच्या’ या आयोजित कार्यक्रमात परिचारिकांनी अरुणाच्या आठवणींना उजाळा दिला.
चार दशके अरुणाची सेवा करणाऱ्या परिचारिकांनी अरुणाचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यासाठी, परिचारिका कल्याणकारी संस्थेतर्फे परिचर्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात एकपात्री प्रयोग, क्रिकेटचे सामने आणि रुग्णांची शुश्रूषा अशा विविध विषयांवरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या परिचारिकांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षाच्या प्रवक्ता नीलम गोऱ्हे, नगरसेवक नाना आंबोले, नगरसेविका ममता चेंबूरकर, ट्रेंड नर्सेस असोसिएशन आॅफ इंडियाच्या अनिता देवधर, असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षा स्वप्ना जोशी आणि महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते.
अरुणाच्या अनेक आठवणी सर्वांच्या मनात घर करून आहेत. या आठवणी ‘स्मृती अरुणाच्या’ या स्मरणिकेत मांडण्यात आल्या आहेत. मान्यवरांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिचारिकांनी फुलाच्या झाडांची रोपटी डॉ. सुपे यांना भेट म्हणून दिली. ही रोपटी केईएमच्या प्रांगणात अरुणाच्या आठवणीत लावा, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुपे यांनी सांगितले, ‘आजच्या जगात इंटरनेटमुळे सर्वांकडे ज्ञान उपलब्ध आहे. काही जण कौशल्य आत्मसात करतात, पण सेवाभाव कमी झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातही सेवाभावाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कुठेतरी हा सेवाभाव वाढला पाहिजे. ४२ वर्षे सर्व परिचारिकांनी अरुणा यांची सेवा केली. त्यामुळे जगासमोर एक उदाहरण बनले आहे. हा सेवाभाव असणे महत्त्वाचे आहे. सेवाभाव वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
‘परिचारिकांसाठी वाचनालय आणि जिम सुरू करण्यात आले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. ज्या परिचारिका याचा वापर करतील, त्या व्हॉट्स अ‍ॅपवर आम्हाला प्रतिक्रिया देऊ शकतात,’ असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर, महापालिकेशी चर्चा करून अन्य महापालिका रुग्णालयातही परिचारिकांसाठी अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची इच्छा या वेळी नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. परिचारिका या रुग्णालयाच्या आई असतात. सर्व गोष्टींकडे त्या लक्ष देतात, पण त्यांच्यावर येणारा कामाचा ताण अधिक आहे. हा ताण कमी करण्यासाठी रुग्णालयात ४०० ते ५०० परिचारिकांची भरती करावी, अशी इच्छा नगरसेवक नाना आंबोले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
>डोळ्यात तरळले अश्रू : अरुणा शानबाग यांच्या जीवनावर आधारित एक चित्रफित या कार्यक्रमात दाखवण्यात आली. ही चित्रफित पाहताना अनेक परिचारिकांना अश्रू अनावर झाले. अरुणाचा सगळा प्रवास त्यांच्या डोळ््यासमोरून तरळला असल्याचे मत परिचारिकांनी व्यक्त केले.

Web Title: Arun's memories are bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.