महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 06:32 PM2024-08-25T18:32:24+5:302024-08-25T18:35:23+5:30

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मविआसाठी धक्का मानला जात आहे. 

Arvind Kejriwal's 'AAP' quits Maha vikas Aghadi, Three candidates announced | महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

Maha Vikas Aghadi AAP: दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, तीन मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात आधी स्वबळाची घोषणा करत उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता आम आदमी पार्टीनेही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी महाविकास आघाडीत सामील झाली होती. आपला एकही जागा मिळाली नव्हती. 

आप महाराष्ट्रात 288 जागा लढवणार

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवणार आहे. पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांनी ही माहिती दिली. परभणी येथे माध्यमांशी बोलताना घाडगे पाटील यांनी पक्ष कुणासोबतही आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

परभणी विधानसभा मतदारसंघातून आपने उमेदवार जाहीर केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नावाची घाडगे पाटील यांनी घोषणा केली. बीड विधानसभा मतदारसंघातून अशोक येडे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आधीच जाहीर करण्यात आला आहे. 

विरोधकांच्या मतविभाजनाचा धोका

लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने सत्ताविरोधी पक्षांची मोट बांधत चांगले यश मिळवले. पण, विधानसभा निवडणुकीआधीच आम आदमी पक्ष बाहेर पडला आहे. त्यामुळे विरोधकांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो. २०१९ मध्ये आपने जास्त जागा लढवल्या नव्हत्या. पण, यावेळी २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. 

'इंडिया व्होट्स'च्या माहितीनुसार २०१९ मध्ये आम आदमी पक्षाने २४ मतदारसंघात उमेदवार दिले होते. एकही जागा जिंकता आली नाही. एका मतदारसंघात आपचा उमेदवार तिसऱ्या स्थानी होता. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५७ हजार ८५३ मते मिळाली होती. यावेळी आपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Web Title: Arvind Kejriwal's 'AAP' quits Maha vikas Aghadi, Three candidates announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.