पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:29 AM2024-11-20T08:29:31+5:302024-11-20T08:30:23+5:30
जेव्हा पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातीलच हा प्रकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले आहेत. महाविकासआघाडीला पराभव स्पष्टपणे दिसत असल्याने खोटे आरोप करत कव्हर फायरिंगचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी लावला. नागपुरात मंगळवारी ते बोलत होते.
जेव्हा पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातीलच हा प्रकार आहे. तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नाही. त्यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. नालासोपारा येथील उमेदवार राजन नाईक यांच्यावरही हल्ला झाला, असे फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांनी सातत्याने सलिम जावेद यांच्या कथांप्रमाणे तथ्यहिन बाबींवर प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अगोदर त्यांनी अशाच प्रकारे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाची पोलखोल झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यातून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. साडेसात किलो दगड मारल्यावरदेखील काच फुटली नाही, बोनेटला स्क्रॅच का आली नाही. एक दगड मागच्या काचेतून आला तर तो अनिल देशमुखांच्या कपाळावर समोरून कसा लागला. अशा प्रकारे केवळ रजनीकांतच्या चित्रपटात दगड फिरू शकतो. देशमुख यांच्याकडून पराभव दिसून लागल्याने भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनीदेखील त्याचे समर्थन केले ही दुर्दैवी बाब आहे. पोलीस चौकशीत नेमके तथ्य समोर येईल, असे फडणवीस म्हणाले.
तावडे मित्र आहेत, जेवायला घेऊन जातो
नालासोपारा येथे पैसे वाटपावरून भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर काही वेळाने बविआचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या गाडीत बसून विनोद तावडे एकत्र जात असल्याचे दिसून आले. यावेळी आ. ठाकूर यांना पत्रकारांनी विचारणा केली असता तावडे माझे मित्र आहेत, त्यांना जेवायला घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेता, कोणतीही गडबड होऊ नये याचे भान ठेवत हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंना आपल्याच कारमध्ये बसवून त्यांना गर्दीतून मार्ग करून दिला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी वसई व विरार परिमंडळामधील सर्वच पोलिस ठाण्यांतून येथे पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.
पत्रकार परिषदा आयोगाच्या आदेशाने झाल्या रद्द
मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे हे आजच्या घटनेवर पत्र परिषदा घेणार होते. तसे अनुक्रमे उद्धवसेना आणि भाजपकडून माध्यमांना कळविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने मनाई केल्यामुळे या पत्र परिषदा रद्द करण्यात आल्या.
मला भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते की, विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी आले आहेत. इथे आल्यावर पैसे वाटताना आढळून आले आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही बंद होते. हॉटेलचालकाची चौकशी करावी. - हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बविआ
हॉटेलच्या हॉलमध्ये कोण पैसे वाटतो का? या हॉटेलमध्ये बूथप्रमुखांना माहिती देण्यात येणार होती. तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते येथे असल्याने त्यांना भेटण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी विनोद तावडे आले होते. - राजन नाईक, भाजप उमेदवार.
भाजप कार्यकर्त्यांना सतर्क करण्यासाठी विनोद तावडे नालासोपारा येथे गेले होते. पण, विरोधकांनी षड्यंत्र रचले आणि ते कोट्यवधी रुपये वाटत असल्याचा बनाव करण्यात आला. तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, ते अशा पद्धतीने पैसे का वाटतील? जे घडविले गेले ते मतदानाच्या तोंडावर भाजपची बदनामी करण्यासाठीच होते. या षडयंत्राचा आम्ही पर्दाफाश करू. -चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप.
तावडे यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले असले, तरी राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. पैसे वाटले जात असले तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही. ही जनता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची आहे. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट
भाजप-शिंदे सरकारचा सपशेल पराभव होत असल्याने आता ते भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाच्या जोरावर जनतेची मते विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी. -नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष