सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:10 PM2024-07-03T15:10:54+5:302024-07-03T15:11:18+5:30
२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. परंतू, तिथे टोल नाक्यावर प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री, आधी जीआर दाखवा मग पाहू असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता.
पंढरीची वारी सुरु झाली आहे. पुण्यातून पालखी पुढे सासवडच्या दिशेने निघाली असून येत्या काही दिवसांत चोहोबाजुंनी पंढरपूरकडे वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे येणार आहेत. या वारकऱ्यांना राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे टोलमाफी जाहीर केली आहे. परंतू, ही टोलमाफी असेच टोलनाक्यावर गेल्यावर मिळणार नाही तर त्यासाठी वाहन मालकांना वाहनाची कागदपत्रे घेऊन जवळचे आरटीओ कार्यालय गाठावे लागणार आहे.
वारकऱ्यांना आजपासून टोलमाफी मिळणार असून २१ जुलैपर्यंत याची मुदत ठेवण्यात आली आहे. वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन सोडले जाणार आहे. या पास, स्टीकरशिवाय वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार नाही.
२०२२ मध्ये राज्य सरकारने पहिली टोलमाफी जाहीर केली होती. परंतू, तिथे टोल नाक्यावर प्रत्यक्षात कोण मुख्यमंत्री, आधी जीआर दाखवा मग पाहू असे म्हणत टोल आकारण्यात येत होता. तसाच प्रकार २०२३ मध्येही घडला होता. वारकऱ्यांना नेमकी टोलमाफी कशी घ्यावी याची माहितीच दिली जात नव्हती. शिंदेंनी टोलमाफी जाहीर केलेली असली तरी आदेश जारी केला नव्हता. यामुळे वारकरी आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात वाद होत होते.
यंदा खूप लवकर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जे वाहनाने जाणारे वारकरी आहेत त्यांच्याकडे कारचे आरसी, पीयुसी, इन्शुरन्स ही कागदपत्रे असतील तर आरटीओत जाऊन अर्ज भरून टोलमाफी घेण्याची संधी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एसटी बसला देखील टोलमाफी जाहीर केलेली आहे. तसेच गरज असेल तर अवजड वाहतूकही थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
फास्टॅगमध्ये पैसे असतील तर...
जर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे असतील व टोलमाफीचा पास मिळाला असेल तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. एकतर फास्टॅगवर अॅल्युमिनिअम फॉईल चिकटवावी लागेल किंवा आतून स्क्रीन ऑन केलेला मोबाईल धरावा लागणार आहे. असे केल्यासच टोल नाक्यावरील स्कॅनरद्वारे तुमचा फास्टॅग स्कॅन होणार नाही व पैसे कापले जाणार नाहीत.