न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:48 AM2024-08-02T05:48:22+5:302024-08-02T05:49:17+5:30
मुंबईला जायचे. हिसका दाखवण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. केवळ बघण्याची भूमिका घेऊ नका. २९ ऑगस्टला निर्णय जाहीर करू, असे जरांगे पाटील म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे. न्याय मंदिर न्याय देते. सरकारशी खेटायला मी खंबीर आहे. सरकार आम्हाला गुंतविण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. शिष्टमंडळ भेटायला येणार नाही आणि आरक्षणाबाबतही काहीच चर्चा झाली नाही. सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
सरकारने ईडब्ल्यूएस सुरू ठेवावे, एसईबीसी सुरू ठेवावे आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्हाला १० टक्के आरक्षण मान्य नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. ७ ऑगस्टपासून सोलापूर येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे.
‘मागे हटायचे नाही’
गरीब मराठे, मागासवर्गीय, माळी मुस्लीम, धनगर यांना मुख्यमंत्री करणार. समाजाला दुखावणार नाही. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव असणार. मुंबईला जायचे. हिसका दाखवण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. केवळ बघण्याची भूमिका घेऊ नका. २९ ऑगस्टला निर्णय जाहीर करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.