तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:04 AM2024-01-09T11:04:04+5:302024-01-09T11:04:30+5:30
ठाकरे गट-शिंदे गटाचे ठरणार भवितव्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर बुधवारी सायंकाळी चार वाजता निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत आहे. विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० महिने झालेल्या सुनावणीनंतर १४ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालानुसार पक्ष कुणाचा आणि आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली. आता ते नेमका काय निकाल देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद
सुनावणीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी तर थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदावरच बोट ठेवले. त्याचप्रमाणे शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी झालेल्या बैठका आणि बजावण्यात आलेला व्हीप म्हणजे बनाव असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
त्याचवेळी ठाकरे गटाकडून २२ जूनआधी पक्षप्रमुख कोण हाेते, यावर अधिक भर देताना घटनेतील १० व्या सूचीचा आधार घेण्यात आला. पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे सुरत, गुवाहाटीला गेलेले आमदार कसे अपात्र ठरतात हे सांगताना त्यांनी अध्यक्षांकडे निष्पक्ष निकालाची अपेक्षा व्यक्त केली होती.
या मुद्यांवर ठरणार निकाल
- विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी बजावलेला व्हीप व मतदान
- विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप व मतदान
- सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानुसार कोणाचा व्हीप पात्र
- सुरत, गुवाहाटीला जाणे ही पक्षविरोधी कारवाई ठरते का?
- दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे, पुरावे
- उलटतपासणीवेळी साक्षीदारांची उत्तरे व वकिलांचा युक्तिवाद
शक्यता काय?
ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार असल्याने निकाल शिंदे गटाकडे झुकता असेल असा कयास बांधला जात आहे. यामुळेच सुनावणीला जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला होता. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यास त्यांना एकतर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवावे लागेल. मात्र, यामुळे ठाकरे गटाला सहानुभूती मिळू शकते.
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात
शिवसेना प्रताेद सुनील प्रभू यांचा व्हीप मान्य झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार अपात्र ठरू शकतात. तसे झाल्यास सरकार अस्थिर होऊ शकते. मात्र, या निर्णयाची शक्यता धूसर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दाेन्ही गटांचे आमदार अपात्र ठरणार नाहीत
विधानसभा अध्यक्ष सुवर्णमध्य गाठत दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र न ठरवता वेगळाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या सहानुभूतीची शक्यता मावळेल व सरकारही अस्थिर होणार नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयानुसार दोन्ही पैकी एका गटाला अपात्र ठरवावेच लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.