२०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 01:31 PM2023-04-30T13:31:29+5:302023-04-30T13:32:18+5:30

घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे. 

As Sanjay Raut wanted to become Chief Minister in 2019...; BJP leader's Nitesh Rane big claim | २०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

२०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

googlenewsNext

मुंबई - . २०१९ ला मला मुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव शरद पवारांच्या माध्यमातून संजय राऊतांनी दिला होता. पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळे असल्याने राऊतांचे नाव नाकारले गेले. संजय राऊत घरात घेण्याच्या लायकीचा माणूस नाही. संजय राऊतांचे अस्तिस्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात काय आहे? तेजस आणि आदित्य या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना घरात घेणे बंद करावे. हे या दोन्ही भावातही भांडणे लावण्याचं काम करतोय असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

आमदार नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतांसारखी माणसं घरात का घ्यायची नाही हे उदाहरण सांगतो. लोकप्रभात असताना राऊतांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली. त्यात वैयक्तिक बाळासाहेब-माँसाहेबांच्या संबंधांवर प्रश्न विचारले. त्यावर बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले होते. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची कार फोडली. त्याचे कारण राऊत आणि त्यांची टोळी बाळासाहेबांच्या घरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावण्याचं काम करत होते. जुन्या शिवसैनिकांनाही हे माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत १९९८ साली संजय राऊतांना खासदारकी नाकारली होती. तेव्हा सामनात बाळासाहेबांविरोधात राऊतांनी अग्रलेख लिहिला होता. त्यावेळी आजूबाजूचे शिवसैनिक ज्यांना आजही मी उभे करू शकतो जे आज हयात आहेत. त्यांच्यासमोर काय वक्तव्य केले, थांबा मला खासदारकी दिली नाही ना, मी या बाप-लेकाला पोहचवतो. बाप-लेक कोण तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे असा आरोपही नितेश राणेंनी राऊतांवर केला. 

दरम्यान, संजय राऊतांच्या वडिलांचे नाव राजाराम आहे हे किती लोकांना माहिती आहे. दुसऱ्याचे बाप काढायचे, तुम्ही कुठल्या बापाचे नाव लावता? सिल्व्हर ओक की मातोश्री कुणाचं नाव लावून फिरतोय? स्वत:च्या बापाचं नाव सांग, पहिल्यापासून कुणाचे बाप काढायचे. घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे. 

पवारांच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न
पवार कुटुंबातही भांडणे लावण्याचे काम आता संजय राऊत करतायेत. अजित पवारांविरोधात बोलायचे, शरद पवारांच्या बाजूने बोलायचे जेणेकरून एकसंघ असलेला पवार कुटुंब यांच्यात फूट कशी पाडायची हा कार्यक्रम संजय राऊत यांनी सुरू केलाय. अजित पवारांनी त्यांच्या भाषेत खडसावलं आहे. पवार कुटुंबातही राऊत भांडण लावतायेत असं नितेश राणेंनी म्हटलं. 

तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात वाद निर्माण करण्याचं कामही संजय राऊत करतायेत असं ऐकायला मिळाले. आदित्य ठाकरेंचा प्रभाव वाढतोय त्यामुळे राऊत आणि टोळीने षडयंत्र रचलं. युवासेना प्रमुख म्हणून वरूण सरदेसाईंचे नाव पुढे येत होते. मग अचानक हे नाव गायब झाले. कारण युवासेनाप्रमुख वरूण सरदेसाई होणार, आदित्य ठाकरे पुढे जाणार मग आमचे काय होणार? त्यानंतर सामनात तेजस ठाकरेंच्या नावाने जाहिरात छापून आणायची. तेजस ठाकरेंचे बॅनर्स लावायला लावायचे. मातोश्रीत तेजस आणि आदित्य यांच्यात भांडणं झाल्याचं ऐकायला आले. काही दिवस तेजस कर्जतच्या फार्म हाऊसवर राहायला गेला होता. संजय राऊत आगलाव्या आहे. ज्या मालकाचे मीठ खातो त्याच्याही घरात आग लावण्याचं काम राऊत करतायेत असा आरोपही राणेंनी केला. 

मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य नाराज झाला होता 
आदित्य ठाकरेंवर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियन आज जिवंत असती. आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करून आरेत आंदोलन केले. लहान मुले का लागतायेत हे सांगू का? उद्धव ठाकरेंचा कुणाला फोन गेला हे सांगू नका. मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती ते मिळत नव्हते म्हणून दावोस दौऱ्याच्या नावाखाली लंडनला जाऊन बसले होते. आमच्या नेत्यांबाबत वक्तव्ये करू नयेत. सत्तेसाठी हापापलेली लोक आहेत अशी टीका भाजपा आमदार राणे यांनी केली. 

बारसू इथं जाताना गुंड का हवेत?
बारसू दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरेंना गुंड का हवेत? मकोका, ३०२ सारखे गुन्हे असलेल्यांना मेसेज कुणी पाठवले. गोवंडी, टिळकनगर येथील गुंडांना उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यावर जायचंय असं सांगण्यात आले. बारसू येथे स्थानिकांशी बोलायचे आहे मग गुंडांना का घेऊन जाताय? जामीनावर बाहेर आलेल्यांना घेऊन का येतायेत? मी स्क्रीनशॉट्स, नंबरसकट नावांची यादी द्यायला तयार आहे. सामान्य लोकांना घाबरवायचे आहे का? मी रत्नागिरी SP यांना उद्धव ठाकरेंसोबत आलेल्या प्रत्येकाचे वाहन तपासा, गाडीत कोण आहे त्यांचा गुन्हेगारी इतिहास तपासा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Web Title: As Sanjay Raut wanted to become Chief Minister in 2019...; BJP leader's Nitesh Rane big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.