Devendra Fadnavis : फडणवीसांनी चूक पकडताच संजय राऊतांची सारवासारव; 'त्या' व्हिडिओवर लगेच स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:02 PM2022-12-18T21:02:00+5:302022-12-18T21:04:47+5:30
"त्या व्हिडिओसंदर्भात मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते (संजय राऊत) अधूम मधून असे करत असतात."
कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोर्चांचा दिवस होता. एकिकडे महाविकास आघाडीने 'महामोर्चा' म्हणत मोर्चा काढला होता. तर दुसरीकडे त्याला प्रत्युत्तर म्हणून, भाजप-शिवसेनेने (शिंदे गट) 'माफी मांगो' म्हणत मोर्चा काढला होता. भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याचे म्हणत, मविआचे नेते शनिवारी मुंबईत रस्त्यावर उतरले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या या मोर्चाचा उल्लेख 'नॅनो मोर्चा' असा करत खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देत राऊतांनी एक व्हिडिओ शेअर केला. पण, तो व्हिडिओ मविआचा नसून, मराठा क्रांती मोर्चाचा आहे, असे म्हणत एका पत्रकाराने फडणवीसांना प्रश्न केला. यावर मी त्याची पडताळणी करेन, असे फडणवीस म्हणाले. यानंतर, आता संजय राऊतांनी यावर तत्काळ ट्विट करत सारवासारव केली आहे.
राऊत सारवासारव करत म्हणाले "डरो मत!" -
यानंतर आता संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर सारवासारव करत, "जरूर चौकशी करा... मराठा मोर्चा सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे.. महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती... करा चौकशी!आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!" असे म्हटले आहे.
नेमकं काय घडलं? -
खरे तर, काल निघालेल्या दोन्ही बाजूंच्या मोर्चांपैंकी कुणाच्या मोर्चाला अधिक गर्दी होती हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. यातच फडणविसांच्या 'नॅनो मोर्चा' या टीकेला उत्तर देताना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत, 'देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच,' असे म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS
मी नक्की पडताळणी करेन -
राऊतांच्या या ट्विटसंदर्भात एका पत्रकाराने पत्रकारपरिषदेदरम्यान फडणवीस यांना प्रश्न केला होता. यावर, "तुम्ही नवीनच माहिती देत आहात, मलाही हे माहीत नव्हते. आता संजय राऊतांनी मोर्चाचा जो व्हिडिओ ट्विट केला आहे, तो मराठा मोर्चाचा व्हिडिओ आहे. त्याची मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते अधूम मधून असे करत असतात. कारण मोठा मोर्चा नव्हताच. त्यामुळे त्याचा व्हिडिओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच ट्विट करावा लागेल," असे फडणवीस म्हणाले.