हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:31 PM2024-10-07T17:31:09+5:302024-10-07T17:35:04+5:30

"दिल्लीश्वरांनी जबरदस्ती केली, तेव्हा शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवला," असेही जयंत पाटील म्हणाले.

As soon as Harshvardhan Patil joined the party, state president Jayant Patil said, "This great bow of Indapur..." | हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."

हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."

Jayant Patil on Harshvardhan Patil Joins Sharad Pawar: हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाच्या सोहळ्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. त्यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. "आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहून इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झालंय. महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागे उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवारांना मोडण्याचे प्रयत्न केले,  ईडीची नोटीस पण पाठवली, पण शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवला. इंदापूरचे हे महाधनुष्य हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षात आल्यामुळे आपल्यासाठी सोपे झाले," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


"महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवारसाहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचं काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवारांच्या मागं उभी राहिली", असे जयंत पाटील म्हणाले.

"हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले. पण, तुम्ही स्वगृही येत आहात, यापूर्वीच तुम्ही यायला हवं होतं. आमच्याकडे गर्दी होती, आता येत आहात याचा आनंद आहे. बहुजनांच्या उद्धाराचे राजकारण करण्याची पवारसाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी जपली आहे. कितीही हल्ले झाले तरी बहुजन समाजाच्या विकासाची पताका खांद्यावर घेऊन ते चालत आहेत, त्यामुळं शरद पवारांसोबत लोक येत आहेत", असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

"लोकसभा निवडणुकीत ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या दोन महिन्यांसाठी लाडक्या झाल्या. पण सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना थरकाप उडवणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या हातात काही राहिलेले नाही. माझे बहिणींना हेच सांगणे आहे की, सावत्र भावाच्या प्रेमाला भाळून काही चुका करू नका," असे म्हणत त्यांनी महिला मतदारांना उद्देशून सूचक विधान केले.

Web Title: As soon as Harshvardhan Patil joined the party, state president Jayant Patil said, "This great bow of Indapur..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.