प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं भाजपाचं निवडणुकीतलं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:49 PM2022-08-12T16:49:12+5:302022-08-12T16:49:39+5:30

देशातील नेतृत्वाचं मार्गदर्शन घेऊन आगामी काळात कार्यकर्त्यांची शक्ती वाढवणार आहे. माझी कार्यकर्ता म्हणून निवड झाली आहे असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलं आहे.

As soon as he became the state president, Chandrasekhar Bawankule told the election target of BJP | प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं भाजपाचं निवडणुकीतलं टार्गेट

प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं भाजपाचं निवडणुकीतलं टार्गेट

Next

अमरावती - राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता भाजपात संघटनात्मक फेरबदल झाले आहेत. मागील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदावर संधी मिळाल्यानंतर दिल्लीतून नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपानं प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केली आहे. ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांचा विचार करण्यात आला. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. भाजपा सध्या राज्यात नंबर वनच आहे. आता पुन्हा बूथ शक्ती मजबूत करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळवून देऊ. आगामी लोकसभेत शिवसेना-भाजपा युतीला ४५ प्लस आणि विधानसभेत २०० प्लस जागा जिंकण्यासाठी. महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत पक्षाला नंबर वन ठेवण्यासाठी कार्यकर्ते प्रचंड ताकद तयार करू. पक्षाने जो विश्वास व्यक्त केला त्याला तडा जाणार नाही यासाठी मी काम करेन असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशातील नेतृत्वाचं मार्गदर्शन घेऊन आगामी काळात कार्यकर्त्यांची शक्ती वाढवणार आहे. माझी कार्यकर्ता म्हणून निवड झाली आहे. राज्यातील बारा कोटी जनतेला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार यांच्याशी समन्वय करून सत्ता आणि संघटना यांचा मिलाप करून जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न, शेवटच्या घटकातील माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. 

दरम्यान, संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी, भाजपा महाराष्ट्रात एक नंबर बनवण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे. पुढच्या काळात मोदींच्या नेतृत्वात, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं तत्व, विचार पुढे न्यायचं आहे. कुठल्याही एका व्यक्तीसाठी काम करायचं नाही. भाजपा घराघरात पोहचवण्यासाठी काम करायचं आहे असंही बावनकुळे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आम्हाला वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी राठोड यांना मंत्रिपद दिल्याच्या वादावर भाष्य करणं टाळलं. 
 

Web Title: As soon as he became the state president, Chandrasekhar Bawankule told the election target of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.