आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार दानवेंच्या केबिनमध्ये; उद्धव ठाकरेंना भेटले, विनवणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 08:30 PM2024-06-28T20:30:10+5:302024-06-28T20:30:35+5:30
शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी गुरुवारी शरद पवार गटात जाण्यासाठी जयंत पाटलांची भेट घेतल्याचे वृत्त असताना आज शिंदे गटासोबत गेलेल्या आमदाराने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या आमदराची विधान परिषदेची टर्म गुरुवारी संपली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या माजी झालेल्या आमदाराने थेट विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवेंचे दालन गाठत ठाकरेंची भेट घेतली.
शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे निवडून आलेले खासदार पाहता या आमदारांना त्यांच्या आमदारकीची भीती वाटू लागली आहे. परंतू ठाकरेंनी दारे बंद केल्याचे जाहीर केल्याने या आमदारांची कुचंबना होऊ लागली आहे.
तरी देखील आज विधानपरिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बजोरिया यांची काल आमदारकीची टर्म संपली आहे. यावेळी मुलगा विप्लव बजोरिया देखील सोबत होता. या दोघांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दुपारीच दानवेंची केबिन गाठली होती. ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घेण्याची विनवणी बजोरिया यांनी ठाकरेंकडे केली. परंतू ठाकरे यांनी बजोरिया यांना पक्षात घेण्यास स्पषअट नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने व शिंदे सरकारचे शेवटचे अधिवेशन असल्याने ठाकरे विधानसभेत आले होते. काल देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे एकाच लिफ्टने विधानभवनात गेले होते. यामुळे भाजपा ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. यानंतर सायंकाळी अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी शरद पवारांच्या गोटात येण्यासाठी जयंत पाटलांची भेट घेतली होती.