जिल्हा परिषदेची शाळा पडल्याने मुख्याध्यापकाच्या घरीच भरतात वर्ग; दुर्गम भागात शिक्षणाची दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 10:35 AM2022-08-21T10:35:04+5:302022-08-21T10:36:16+5:30
जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील सिंधा गावात असलेल्या एकशिक्षकी शाळेच्या इमारतीची चांगलीच दुरवस्था झाली आहे.
देचलीपेठा (जि. गडचिरोली) : जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील सिंधा गावात असलेल्या एकशिक्षकी शाळेच्या इमारतीची चांगलीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाला चक्क स्वत:च्या निवासस्थानी शाळा भरवावी लागत आहे. यावरून दुर्गम भागातील शाळा इमारतींची काय अवस्था असेल, याचा प्रत्यय यातून येतो.
दरम्यान जुनी झालेली ती शाळा इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. प्रशासनाकडे पाठविला असून त्यावर सकारात्मक प्रतिसादही त्यांना मिळाला आहे. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा केंद्रांतर्गत सिंधा या छोट्याशा गावात अनेक वर्षांपासून ही एकशिक्षकी शाळा आहे. या शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंतचे १२ विद्यार्थी आहेत. यावर्षीच्या पहिल्याच पावसात शाळेच्या जीर्ण झालेल्या छताचा काही भाग आणि व्हरांड्याचा काही भाग कोसळला. वर्गात घुशींनी घर करत माती उकरून काढली आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर असून त्या ठिकाणी बसणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.
...अन् निवासस्थानावर लागला शाळेचा फलक
वर्गखोलीची दुरवस्था पाहता गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुख्याध्यापक डंबाजी गडगिलवार यांनी काही दिवस गावातील समाज मंदिरात शाळा भरविली. पण, त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी वापरली जाणारी भांडीकुंडी ठेवलेली असल्याने ती कोणी उचलून नेऊ नये म्हणून मुख्याध्यापकानी गावातील आपल्या भाड्याच्या खाेेलीतच शाळा भरवणे सुरू केले. खोलीच्या बाहेरच शाळेचा फलकही टांगला आहे.
या एकशिक्षकी शाळेची कौलारू इमारत खूप जुनी आहे. त्या इमारतीची दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यामुळे नवीन शाळा बांधकामासाठी जुलै महिन्यात प्रस्ताव पाठविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. पण, तोपर्यंत मुख्याध्यापकाच्या घरी शाळा भरविण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे.
- अर्चना वैद्य, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती-अहेरी