“मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा, सरसकट दिले नाही तरी...”; ओवेसींची ठाकरे सरकारकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:52 PM2021-11-18T18:52:16+5:302021-11-18T18:56:36+5:30
ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
औरंगाबाद: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर अनेकविध मुद्द्यांवरून टीका करण्यात येत आहे. यातच आता एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयाने ज्या ५० जातींना आरक्षण देता येते, असे म्हटले आहे, त्यांना तरी आरक्षण द्या, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.
राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा कायदा मंजूर करावा. मुस्लिम समाजातील ५२ जातींचे मागासलेपण उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. असे असताना मुस्लिमांना अद्याप आरक्षण देण्यात आले नाही. हा मुद्दा घेऊन मुसलमान समाज डिसेंबर महिन्यात मुंबईला धडकणार आहे, असा इशारा ओवेसी यांनी दिला.
मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे
मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महाराष्ट्रातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देता येते असे म्हटले आहे. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागसपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणे हा अन्याय आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे
सरकारला आणखी कुणाला द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. मुस्लिमांचे सामाजिक, शैक्षणिक मागासपण सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने ते मान्य केले आहे. तरीही सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही. यानंतर आमच्याकडे बोट करून आम्ही धार्मिक असल्याचे म्हणतात. हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.