असदुद्दीन औवेसींनी सोलापूर येताच केली मोठी चूक, पोलिसांनी कापले चालान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:52 PM2021-11-23T14:52:34+5:302021-11-23T14:54:54+5:30
असदुद्दीन औवेसी आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध शहरांचे दौरे करत आहेत.
सोलापूर:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी(AIMIM Asaduddin Owaisi) मंगळवारी सोलापूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात आले होते. पण, यादरम्यान त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या कारमधून प्रवास केल्यामुळे पोलिसांनी त्यांना 200 रुपयांचा दंद ठोठावला.
एमआयएमकडून पालिका निवडणुकीची तयारी
असदुद्दीन औवेसी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते नंबर प्लेट नसलेल्या वाहनात दिसत आहेत. मात्र, यावेळी औवेसी मास्क घालायला विसरले नाहीत आणि गाडीतून उतरण्यापूर्वी मास्क घातलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला पालिका निवडणुका होणार आहेत.
मुंबईत रॅलीची परवानगी नाही
एमआयएम महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत असून असदुद्दीन औवेसी निवडणुकीची तयारी करत आहेत. यासाठी ते राज्यातील विविध शहरांत फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर आज सोलापूरमध्ये आले. पण, औवेसींना कोरोना महामारीमुळे मुंबईत रॅलीची परवानगी मिळालेली नाही. औवेसी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका सभेला संबोधित करणार होते, तरीही त्यांना प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही.