आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार
By Admin | Published: December 22, 2016 04:30 AM2016-12-22T04:30:07+5:302016-12-22T04:30:07+5:30
‘आलोक’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून ग्रामीण विश्वाचे वास्तव लोकांसमोर मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांना
मुंबई : ‘आलोक’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून ग्रामीण विश्वाचे वास्तव लोकांसमोर मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती साहित्य अकादमीतर्फे देण्यात आली आहे.
साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक साहित्य अकादमी पुरस्काराची बुधवारी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. साहित्य विश्वातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार म्हणून ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराची ओळख आहे. देशभरातील २४ भाषांमधील विविध साहित्य प्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. मराठीतील लघुकथांसाठी आसाराम लोमटे लिखित ‘आलोक’ या कथासंग्रहाची निवड यंदा पुरस्कारासाठी करण्यात आली
आहे.
आसाराम लोमटे हे परभणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक असून ग्रामीण जीवनावर भाष्य करणारा असा ‘आलोक’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आहे. नातेसंबंध, माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष ‘आलोक’मधील प्रत्येक कथांमधून डोकावतो. याशिवाय लोमटे यांनी लिहिलेला ‘इडा पीडा टळो’ हा कथासंग्रहदेखील तितकाच चर्चिला गेला आहे.
मराठीसोबतच कोकणी भाषेत एडीविन डिसोझा यांनी लिहिलेल्या ‘काळे भांगार’ या कादंबरीलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आसामी, बंगाली, ओडिसी, इंग्रजी, हिंदी, मल्ल्याळम, तेलगू आदी भाषांमधील साहित्यातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून १ लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)