तंबोऱ्याचा मोठा भोपळा आणि समोर बसलेली ही चिमुरडी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:53 PM2022-02-07T13:53:31+5:302022-02-07T13:54:22+5:30
एका सकाळी मी डोळे उघडले. तंबोऱ्याच्या चार तारा छेडल्या जात होत्या. मी किलकिले डोळे करून बघितले. कारण थंडी मी म्हणत होती, आम्ही पाच भावंडे नेहमीच एकमेकांना चिकटून झोपत असू आणि दादागिरी करून आम्हाला मध्ये घालून 'लतुटली' नेहमी स्वत: मात्र कोपऱ्यातली जागा घेई, कारण ती स्वत:ला फार स्वच्छ समजते.
माझ्या आठवणीचे डोळे मी जेव्हा उघडते तेव्हा त्या डोळ्यांना माझे बाबा, माई, लता, (होय, तेव्हा मी दीदीला लताच म्हणत असे) मीना, उषा, बाळ दिसतात. त्याच प्रमाणे एक लांबच लांब गॅलरी असलेले घर... त्या घरासमोर खूप जोरात भांडणाऱ्या बायका, एक हिरवे तळे अशा खूप खूप गोष्टी दिसतात आणि मग नजर पुन्हा माझ्या दिदीकडे वळते.
एका सकाळी मी डोळे उघडले. तंबोऱ्याच्या चार तारा छेडल्या जात होत्या. मी किलकिले डोळे करून बघितले. कारण थंडी मी म्हणत होती, आम्ही पाच भावंडे नेहमीच एकमेकांना चिकटून झोपत असू आणि दादागिरी करून आम्हाला मध्ये घालून 'लतुटली' नेहमी स्वत: मात्र कोपऱ्यातली जागा घेई, कारण ती स्वत:ला फार स्वच्छ समजते. आम्ही सगळी मात्र घाणेरडी. आणि वर इतक्या थंडीत झोपू सुद्धा देत नाहीये, बसली तंबोरा वाजवत. मी आणखी जरा डोळे उघडले. तंबोऱ्याचा एक मोठा भोपळा आणि त्याच्यासमोर ही 'मियाँ मूटभर दाढी हातभर' बसली होती. तंबोरा वाजवताना बसतात तशी "जय बजरंगबली' थाटात बसली होती. त्यावेळी ती मला खूप मोठ्या चक्री भोपळ्याजवळ एक छोटीशी नाजूक खारोटी बसावी तशीच दिसली आणि मी परत डोक्यावरून दुलई घेऊन झोपले.
कागदाची विमानं करण्यात ती पटाईत...
पुन्हा धूसर धूसर असे काहीतरी आठवते ते असे की सोलापूरला आमच्या कंपनीचा मुक्काम आहे. तिथे ही कधी खेळताना तर कधी मारामारी करताना दिसत आहे. कागदाची विमाने करण्यात तर ती प्रवीण होती. तिची विमाने खूप उंच जायची. आम्ही तिच्याकडे जाऊन 'हे दे ना करून', 'ते दे ना करून' असे सारखे तिला सतवायचो. मग सोलापूरची एक रात्र आठवते. त्या रात्री ऑडियन्समध्ये मी माईच्या मांडीवर डोके ठेवून झोपण्याच्या तयारीत आहे. आमचे बाबा गाऊन थकले आहेत कारण दोन तास ते सारखे गात आहेत. लोक वाहवा करीत आहेत. बाबांना पण विश्रांती पाहिजेच आहे. नाही का? मी मात्र कंटाळून गेले आहे. तितक्यात मी समोर बघते. अरे, ही तर लतुटली. ही काय गाणार वाटते? मी सरळ होऊन बघू लागले. चिटाचा फ्रॉक, दोन प्रसिद्ध वेण्या आणि सरळ येऊन बसली की मांडी घालून स्टेजवर! जरासुद्धा भीती नाही की काही नाही. आणि जयजयवंतीचा ख्याल सुरू केला. आता आहे की नाही? तुम्हाला माहीत नाही. ही अशीच त्रासदायक आहे. आम्हाला सारखी म्हणते कशी, 'सकाळी उठा लवकर आणि सा रे ग म प ध नि सा शुद्ध स्वरात लावा.' म्हणजे एक तर लवकर उठा अन् दुसरे, गात राहा मग खेळणार कोण? मोठी आली आहे सांगायला! पण सगळ्या भावंडात थोरली आहे ना. शिष्ट कुठली... तेवढ्यात किती जोरात टाळ्या पडल्या. सगळे लोक म्हणत होते, 'बाप से बेटी सवाई होणार बरे का!"
आता माझे नाव घालवणार तू...
पुढे मग काहीतरी उलथापालथ झाली व आम्ही सगळे पुणे मुक्कामी आलो. त्यावेळी 'खजांची' मधल्या गाण्याची स्पर्धा होती. आमच्या मावशीचे पतीराज श्री. गोडबोलेदादा यांनी बाबांची परवानगी न घेताच दीदीचे नाव त्या स्पर्धेत दाखल केले. मग काय विचारता ! बाबा असे रागावले की, ते दीदीला म्हणाले, "आता माझे नाव तू घालवणार.. जा, या स्पर्धेत पहिली होऊन ये. नाहीतर पुन्हा घरी येऊच नकोस..' ते एकसारखे असे बोलत होते. त्यावेळी दीदी कितीतरी रडली होती, आता काय होणार म्हणून. पण म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात! त्यानंतर एकदम आठवते ती कार्यक्रमाहून परत येणारी दीदी. तिच्याबरोबर बाबा आणि मी गाडीत होतो. बरोबर आणखी कोण होते ते नाही आठवत. दीदी साडीत होती की तिने फ्रॉक घातला होता तेही नाही आठवत. आठवतात ते फक्त तिच्या छातीवर लावलेले बिल्लेच बिल्ले आणि तिचे खूप चमकणारे डोळे. ते डोळेच सांगत होते की मीच पहिली येणार आताच नव्हे, या स्पर्धेपुरतीच नव्हे, तर हमेशा आयुष्यभर!
त्या अशुभ वर्षात सगळीकडे अंधार झाला
नंतर ते अशुभ वर्ष आले. सगळीकडे अंधार झाला. कुठलाही आसरा नव्हता. आम्ही अगदी निराधार झालो. छे. चुकले मी. आमचे बाबा वारले होते, पण दुसरे बाबा फक्त बारा वर्षाचे, परकर पोलका नेसून आम्हाला सांभाळायला सज्ज झाले होते. दीदीने सगळा भार आपल्या एवढ्याशा खांद्यावर उचलला होता. आम्ही कोल्हापूरला गेलो. दीदी विनायकांच्या कंपनीत काम करू लागली. काम करता करता माईच्या मागे तिचा सारखा लकडा चालू असे. 'माई, मुलांना शाळेत घाल. त्यांची वये गेली नाहीत अजून मी त्यांना खूप शिकवणार आहे. माझ्या भावंडांना मी डॉक्टर करणार आहे. इंग्लंडला पाठवणार आहे.'
भर तापात तिने गाणे पूर्ण केले तेव्हा -
त्यावेळी ती कशी कामे करी याची एक आठवण सांगते. 'गजाभाऊ' चित्रपटातल्या एका गाण्याचे शूटिंग होते आणि दीदीच्या अंगात एकशे चार ताप होता. माई तिला म्हणाली, "लता, आज तू कामाला जाऊ नकोस." पण दीदी म्हणाली, "नाही गेलेच पाहिजे." तिला आपल्यावरच्या जबाबदारीची कल्पना होती. तशा अवस्थेत ती कामाला गेली आणि भर तापात तिने ते गाणे केले. गाणे देखील विलक्षण होते. दीदीच्या अंगात परीचे कपडे घातले होते आणि पंखांना दोऱ्या बांधून बिवारीला टांगून ठेवले होते. तशा अवघडलेल्या स्थितीत तिने शूटिंग केले, अशी ही कामसू मुलगी...
म्हणून त्यांनी स्वत:चे आडनाव बदलून घेतले...
लता मंगेशकर यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. शेवंती (शुद्धमती) अर्थात माई मंगेशकर या दीदींच्या आई. माईंचे मूळगाव खान्देशातील थाळनेर आणि त्या दीनानाथ यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मंगेशकर कुटुंबाचे आडनाव हर्डीकर होते, परंतु दीनानाथ यांनी ते बदलून मंगेशकर असे केले. आपल्या कुटुंबाचे मूळ गाव मंगेशी (गोवा) याचा उल्लेख कायम राहावा, यासाठी त्यांनी आडनावात बदल करून घेतला होता.
लहानपणी तिला सगळे हेमा म्हणायचे -
लता मंगेशकर यांना लहानपणी 'हेमा' या नावाने हाक मारली जायची, पण नंतर दीदींच्या वडिलांनी ‘भावबंधन’ या नाटकाने प्रेरित होऊन दीदींचे नाव बदलून लता असे ठेवले आणि नंतर संगीत क्षेत्रात या नावाने अक्षरश: इतिहास घडविला. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लतादीदींना संगीताचे पहिले धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.
आवाज पातळ आहे म्हणून नाकारले गेले...
१९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली) यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. गुलाम हैदरांनी लतादीदींची ओळख तेव्हा 'शहीद' (१९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निमार्ते शशिधर मुखर्जींशी करुन दिली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते, 'येणाऱ्या काळात निमार्ते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील'. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) या चित्रपटात 'दिल मेरा तोडा' हे गाणे म्हणण्याची संधी दिली.
आणि उर्दू मौलवींनी उच्चार शिकवले
सुरुवातीला लतादीदी आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत, पण नंतर त्यांनी स्वत:च्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांत भरपूर उर्दू शब्द असत. एकदा अभिनेता दिलीपकुमार यांनी लतादीदींच्या हिंदी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा दीदींनी शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.
मास्टर विनायक यांनी काळजी घेतली...
१९४२ मध्ये लतादीदी अवघ्या १३ वर्षांची होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक ह्यांनी लतादीदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लतादीदींनी 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या 'किती हसाल' (१९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली 'मंगळागौर' (१९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी 'नटली चैत्राची नवलाई' हे गीत गायले.
('संगीत क्षेत्रातील चंद्रमा लता' हे प्रसाद महाडकर, विवेक वैद्य यांनी सादर केलेल्या पुस्तकातून साभार.)