आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 06:13 PM2020-06-29T18:13:42+5:302020-06-29T18:14:47+5:30
जिल्हा प्रशासनाने पालख्या घेऊन जाणाऱ्या 80 लोकांची कोरोना चाचणी केल्याने मोठा धोका टळला..
पुणे : आषाढीवारी निमित्त पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव आणि श्री चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 80 व्यक्तींची जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 4 व्यक्तींच्या चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे या चार व्यक्तींना आता पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. विश्वस्तांकडून कळविण्यात आलेल्या यादीमध्ये या व्यक्तींचा समावेश होता. प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
आषाढीवारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी येथून, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांची देहू येथून , श्री संत सोपानदेव यांची जेजूरी आणि श्री चांगावटेश्वर महाराज यांची सासवड येथून या चार संताच्या पादुका मंगळवार (दि.30) रोजी पुणे जिल्ह्यातून एसटीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या प्रत्येक पालखी सोहळ्यात केवळ केवळ 20 व्यक्तींना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वरील चार पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व 80 व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यात 4 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे स्षष्ट झाले. यामुळे प्रशासनाने तातडीने संबंधित विश्वस्तांना कळविण्यात आले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे मात्र मोठा अनर्थ टळला आहे.