आषाढी वारी : माऊलीच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश
By admin | Published: July 5, 2016 05:58 PM2016-07-05T17:58:18+5:302016-07-05T17:58:18+5:30
ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़
बाळासाहेब बोचरे
लोणंद, दि. ५ : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड हरिनामाची पेरण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़
दोन दिवस सतत पडणारा पाऊस सोसत मंगळवारी ११ वाजता पालखी सोहळा निरानदीकाठी दुपारच्या विसाव्याला थांबला होता़ पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० किमीचा महत्वाचा टप्पा पार केला़ पालखीला निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव आले होते़ पुणे जिल्ह्यातील पालखीच्या प्रवासाबद्दल आणि अडचणीबद्दल त्यांनी पालखी व्यवस्थापन व वारकऱ्यांशी चर्चा केली़
सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांचे चैतन्य
ज्या गुरू हैवतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला़ त्यांच्या सातारा पुण्यभूमीत मंगळवारी वारकऱ्यांनी पाऊल ठेवताच त्यांच्यामध्ये वेगळेच चैतन्य फुलले़ निरा नदीपार करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना वारकऱ्यांनी एका वेगळ्या उत्साहात नाचत नाचत हरीनामात तल्लीन होत सातारा जिल्ह्यात पहिला मुक्काम असलेल्या लोणंद केव्हा गाठले हे कळलेही नाही़ जेजुरी ते लोणंदपर्यंत रस्ता अरूंद आणि चिखलमय असला तरी वारकऱ्यांनी आनंदाने पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला़
उद्या उभे रिंगण सोहळा
बुधवार ६ जुलै रोजी पालखी सोहळा लोणंद मधून निघणार असून सायंकाळी तरडगावच्या मुक्कामी जाणारआहे़ दरम्यान चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्यातील पहिले रिंगण सोहळा होणारआहे़
सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागत
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातून साताऱ्यांच्या खंडाळी तालुक्यात मंगळवारी माऊलीच्या प्रवेश केला़ पडिगाव येथे पालखीच्या स्वागताला आ़ मकरंद पाटील, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जि़प़अध्यक्ष रवी साळुंखे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन पाटील आदी उपस्थित होते़ पाडेगावच्या समता आश्रमशाळेच्या मुलांनी लेझीम आणि झांजच्या तालावर माऊलीचे स्वागत केले़ पर्यावरणाचा संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते़
शौचालये कुचकामी
पालखी सोहळ्यात निर्मलवारीच्या नावाखाली ५०० फिरती शौचालये पाठविण्यात आली आहेत़ पण कुठे गरज आहे आणि कुठे थांबायला हवे याबाबत शौचालय वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने ते कुठेही थांबत असल्याचे आढळून आले़ याबाबत बाळासाहेब चोपदार यांनी चिंता व्यक्त केली़ यावेळी सौरभ राव याबाबत आढावा घेतला जाईल असे सांगितले़