आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:06 PM2023-06-11T21:06:03+5:302023-06-11T21:06:20+5:30

'माझे राजकीय पक्षांना आवाहन आहे की, त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे.'

ashadhi-wari-lathi-charge-on-warkari-in-alandi, devendra fadnavis says There is no baton charge in Alandi, don't politicize an incident that didn't happen | आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext


नागपूर-  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. मात्र या पालखीला सोहळ्याला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. आळंदीत वारकरी बांधवांवर पोलिसांकडून कथित लाठीचार्ज झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. ज्यात पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले की, आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया-

ते पुढे म्हणाले की, गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला 75 पासेस देण्यात याव्यात. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले. मात्र काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. 

सध्या परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या. माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका. गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही, माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.

Web Title: ashadhi-wari-lathi-charge-on-warkari-in-alandi, devendra fadnavis says There is no baton charge in Alandi, don't politicize an incident that didn't happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.