आषाढी यात्राः एकादशी सरली गर्दी ओसरली
By admin | Published: July 16, 2016 08:17 PM2016-07-16T20:17:35+5:302016-07-16T21:12:18+5:30
आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले
Next
>दीपक होमकर / ऑनलाइन लोकमत -
आता कोठे धावे मन
तुझे चरण देखिलिया !
भाग गेला, सीण गेला,
अवघा झाला आनंद !!
पंढरपूर, दि. 16 - आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. पण पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याची हुरहुरीने भाविकांचे मन दाटून आले.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत पंधरा लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते मात्र दुसर्याच दिवशी त्यातील पन्नास टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. त्यामुळे पंढरपूरात आज निम्मी गर्दी कमी झाली. शहरातील गर्दीकमी झाली असली तरी दर्शनाच्या रांगेत मात्र लाखावर भाविक उभे होते. आज पहाटे चार ते पाच यावेळेत मंदिराच्या वतीने नित्यपूजा करण्यात आली आणि केवळ एक तास दर्शनबारी थांबविण्यात आली. त्यामुळे एकादशीप्रमाणे भाविकांना चार-चार तास रांगेत ताटकळत रहावे लागले नाही आणि कालच्या तुलनेत आज व्दादशीला चार-पाच हजार जास्त भाविकांनी दर्शन घेतले.
काल रात्रभर राहुट्यांमध्ये भजन-किर्तन केल्यावर पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन सकाळपासूनच पंढरीचा निरोप घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सकाळपासून एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन येथे मोठी गर्दी वाढली होती.
एकादशी पेक्षा व्दादशीला अधिक जणांनी घेतले पददर्शन
एकादशी सुरु होण्याच्या आदल्या रात्री रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत नित्यपूजा, शासकीय पूजा यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते मात्र व्दादशीला केवळ पहाटे चार ते पाच या एका तासासाठीच मंदिर बंद ठेवण्यात आले. तुलनेेने तीन तास अधिकवेळ दर्शन सुरु असल्याने व्दादशीला सुमारे साडेआठ हजार भाविकांना अधिक दर्शन घेतले.
रात्रभर गरजली पंढरी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल पंढरपूरात आलेल्या बहुतांश भाविकांनी रात्री मुक्काम केला आणि मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूर पर्यंत टाळांचा किनकिनाट, पखवाजाची थाप आणि हरीनामाचा गजराचा ध्वनी ऐकू येत होता. तर अनेक हौशी तरुण वारकर्यांनी रात्री महाव्दारासमोरील गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत नामदेव पायरीसमोर येऊन विविध खेळ खेळले आणि वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.
आनंदाने मन अन खरेदीने बॅग भरली
वारीत आलेल्या वारकर्यांनी परत जाताना विठ्ठलाचा चिरमुरे बत्ताशाचा प्रसाद, विठ्ठलाचे फोटो, टाळ-मृदुंग-पेटी सारखी संगीत वाद्य, देवघरातील पितळी मुर्त्या, दगडी मुर्त्या, कुंकू, उदबत्त्या आणि घरातील लहानग्यांसाठी खेळणी अशी भरपूर खरेदी मोकळ्या हातांनी केली. त्यामुळे जाताना वारकर्यांचे मन जसे आनंदाने भरले तसेच त्यांच्या बॅगाही खरेदीने भरल्या होत्या